माढा – महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा हरितक्रांतीचे शिल्पकार स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात येणारा कृषी दिन आर्या कृषी महाविद्यालय, मानेगाव येथे उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. महाराष्ट्र शासनाच्या कृषी सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर आयोजित कार्यक्रमात प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. कार्यक्रमाची सुरुवात स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी त्यांच्या कृषी क्षेत्रातील दूरदृष्टीपूर्ण कार्याचा गौरव करण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांना आधुनिक, शाश्वत व तंत्रज्ञानाधारित शेतीचे महत्त्व, कृषी क्षेत्रातील नव्या संधी आणि संशोधनाधारित शेतीविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. खंडेराव वाघे यांनी सांगितले की, भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या कृषी क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार, संशोधनाचा प्रसार आणि तरुणांचा सक्रिय सहभाग अत्यंत आवश्यक आहे. महाराष्ट्र कृषी दिन हा केवळ स्मरणदिन नसून शाश्वत शेती, नवसंशोधन आणि शेतकरी सक्षमीकरणाचा संकल्प करण्याचा दिवस आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. धनंजय कुलकर्णी यांनी केले. यावेळी प्रा. संदीप मुरूमकर, प्रा. तुषार नामदे, प्रा. स्नेहल साठे, प्रा. अमोल माळी, प्रा. हनुमंत निगुडे, प्रा. अक्षय शेळके, प्रा. गणेश भोसले, श्री. रोहित घळके, श्री. कुमार शिंदे तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
Post Views: 9