सोलापूर , दि. ११ जुलै –
अहमदाबाद येथे झालेल्या आशिया व्हॉलीबॉल कप स्पर्धेत भारतीय संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत तिसरा क्रमांक पटकावला आणि कांस्यपदक जिंकले. या भारतीय संघात महाराष्ट्र राज्यातील एकमेव खेळाडू ओम लाड याने सहभाग घेतला होता. त्याने आपल्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावर संघाला पदक मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
व्हॉलीबॉलच्या इतिहासात पहिल्यांदाच महाराष्ट्रातील एका खेळाडूने भारतीय संघातून खेळून पदक मिळवून दिले आहे. ओम लाड हा पाडेगाव (ता. कर्जत, जिल्हा अहिल्यानगर) येथील आहे. सध्या चेन्नई येथे इंडियन ओव्हरसीज बँकेत कार्यरत असून, त्याने अत्यंत कमी वयात भारतीय संघात स्थान मिळवले आहे.

त्याच्या या ऐतिहासिक कामगिरीबद्दल व्हॉलीबॉल संघटना, सोलापूर आणि प्रो स्पोर्ट्स फाऊंडेशन, सोलापूर यांच्या वतीने त्याचा सत्कार करण्यात आला. जपान येथे होणाऱ्या आगामी सिनियर एशियन व्हॉलीबॉल स्पर्धा आणि एशियन गेम्ससाठी त्याला या प्रसंगी शुभेच्छा देण्यात आल्या.
या सत्कार समारंभाला आंतरराष्ट्रीय रेफ्री अनिल गिराम, महावितरणचे डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर संजय वाघमारे, तसेच राष्ट्रीय खेळाडू सोहेल पठाण, सुमित बचुटे, मलिक नदाफ आणि सागर अचलकर उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी ओम लाडचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या
























