सोलापूर – कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारा महत्त्वाचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून, बफर साठ्यासाठी कांद्याच्या खरेदी दरात १३ टक्क्यांची वाढ जाहीर केली आहे. यानुसार प्रतिक्विंटल खरेदी दर १,८७५ रुपयांवरून २,१२५ रुपये करण्यात आला आहे. नवे सुधारित दर तात्काळ लागू करण्यात आला असून, या निर्णयामुळे कांदा उत्पादकांना त्यांच्या मालाला अधिक चांगला मोबदला मिळण्याची अपेक्षा आहे. तसेच बाजारातील दराला आधार मिळून भावातील अनिश्चितता कमी होण्यासही मदत होणार असल्याचे मानले जात आहे.
केंद्र सरकार दरवर्षी कांद्याच्या किमतींमध्ये होणारे चढ-उतार नियंत्रित करण्यासाठी बफर साठा उभारते. या साठ्यासाठी राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ (नाफेड) आणि राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ (एनसीसीएफ) यांच्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांकडून कांद्याची खरेदी केली जाते. यंदा खरेदी दरात वाढ करून सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचा विचार केल्याचे स्पष्ट झाले आहे.
गेल्या काही महिन्यांत बाजारात कांद्याचे दर अपेक्षेप्रमाणे वाढले नसल्याने अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले होते. उत्पादन खर्च वाढत असताना बाजारभाव कमी असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी होती. अशा परिस्थितीत सरकारी खरेदी दरात वाढ झाल्याने शेतकऱ्यांना काही प्रमाणात आर्थिक दिलासा मिळणार आहे. विशेषतः दर्जेदार कांदा साठवून ठेवलेल्या उत्पादकांना या निर्णयाचा अधिक फायदा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, यंदा देशात कांद्याचे उत्पादन चांगले झाले असून महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरात या प्रमुख उत्पादक राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर कांद्याचा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे बाजारात पुरवठा मुबलक असला तरी सरकारी खरेदीमुळे अतिरिक्त साठ्याला बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. परिणामी खुल्या बाजारातील भावालाही आधार मिळण्याची शक्यता आहे.
कृषी क्षेत्रातील जाणकारांच्या मते, सरकारी खरेदीचा दर वाढल्याने व्यापाऱ्यांनाही त्यानुसार खरेदी दर वाढविण्याचा दबाव निर्माण होऊ शकतो. त्यामुळे आगामी काही आठवड्यांत कांद्याच्या बाजारभावातही सुधारणा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. निर्यात, बाजारातील आवक आणि मागणी यावर पुढील दरवाढ अवलंबून राहणार असली, तरी केंद्राच्या या निर्णयामुळे बाजारात सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.
चौकट
केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे कांदा उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला असून, सरकारी खरेदीला गती मिळण्याबरोबरच खुल्या बाजारातील दरांनाही आधार मिळेल, अशी अपेक्षा कृषी क्षेत्रातून व्यक्त केली जात आहे.
चौकट
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे
१.बफर साठ्यासाठीचा नवीन खरेदी दर ₹२,१२५ प्रति क्विंटल लागू.
२.वाढीव दरामुळे सरकारी खरेदीत अधिक फायदा मिळण्याची शक्यता.
३.नाफेड आणि एनसीसीएफच्या खरेदी केंद्रांबाबत स्थानिक कृषी विभाग किंवा बाजार समितीकडून माहिती घ्यावी.
४.बाजारभाव आणि सरकारी खरेदी दराची तुलना करून विक्रीचा निर्णय घेतल्यास अधिक लाभ मिळू शकतो.
Post Views: 18