बार्शी – कै. सुशिला बाबासाहेब मनगिरे यांच्या स्मरणार्थ सर्व समाजघटकांच्या सेवेसाठी उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आधुनिक शववाहिकेचे लोकार्पण रविवारी न्यू हायस्कूल प्रांगण, लोखंड गल्ली, बार्शी येथे धार्मिक वातावरणात संपन्न झाले.
श्री.ष.ब्र. श्री १०८ श्रीगुरु राचंलिंग शिवाचार्य परंडकर महाराज (परंडकर मठ संस्थान, बार्शी) तसेच श्री.ष.ब्र. श्री १०८ श्रीगुरु प्रभुदेव शिवाचार्य माढेकर महाराज (माढेकर मठ संस्थान, माढा) यांच्या प्रमुख उपस्थितीत व शुभहस्ते शववाहिकेचे पूजन करुन तिचे समाजासाठी लोकार्पण करण्यात आले.
यावेळी बार्शीच्या नगराध्यक्षा तेजस्विनी कथले, विजय मनगिरे, प्रकाश मनगिरे, गटनेते नागेश अक्कलकोटे, बाळासाहेब आडके, विलास रेणके, प्रशांत कथले, गिरीश बरीदे, नागजी लामतुरे, आण्णा पेठकर, अमित आपटे, नितीन देशमुख, मल्लिनाथ गाढवे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
सर्व समाजघटकांतील मयत व्यक्तींच्या अंत्ययात्रेसाठी ही शववाहिका मोक्षधामापर्यंत उपलब्ध करुन देण्यात येणार असून, ‘ना नफा, ना तोटा’ या सामाजिक तत्त्वावर केवळ रुपये ७०० इतके नाममात्र शुल्क आकारण्यात येणार आहे. आर्थिक परिस्थितीमुळे कोणत्याही कुटुंबावर अतिरिक्त भार पडू नये आणि सन्मानपूर्वक अंत्यविधीसाठी आवश्यक सुविधा सहज उपलब्ध व्हाव्यात, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचे आयोजक रावसाहेब मनगिरे यांनी सांगितले.
या समाजोपयोगी उपक्रमाचे आयोजन रावसाहेब बाबासाहेब मनगिरे, अरुणा मनगिरे व समस्त मनगिरे परिवार यांच्या वतीने करण्यात आले. यावेळी श्रीगुरु राचंलिंग शिवाचार्य परंडकर महाराज (परंडकर मठ संस्थान, बार्शी) मनगिरे परिवाराच्या या सेवाभावी उपक्रमाचे कौतुक करत, समाजहितासाठी उचललेले हे पाऊल अनुकरणीय असून बाबासाहेब मनगिरे, रावसाहेब मनगिरे यांचे दानशूर कुटुंब असल्याचे गौरवोद्गार काढले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते बार्शी येथील अखिल लिंगायत युवक बहुउद्देशीय संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडे ही शववाहिका देखभाल करण्यासाठी सुपूर्द करण्यात आली.
Post Views: 17