जालना : जालना शहर विकास आराखड्यात आरक्षित करण्यात
आलेल्या एसआरपीएफच्या जागेवर भव्य उद्यान, आधुनिक खेळाचे मैदान, जलतरण
तलाव आणि सुसज्ज नाट्यगृह उभारण्यात यावे, तसेच या प्रकल्पासाठी आमदार
अर्जुनराव खोतकर यांच्या माध्यमातून नगर विकास विभागाचा निधी मिळवून
देण्यासाठी प्रयत्न करू व सीएसआर निधी उपलब्ध झाल्यास
विकासकामे उभी राहतील असे नगरसेवक अश्विन भास्करराव अंबेकर यांनी सांगितले.
या संदर्भात अश्विन अंबेकर यांनी महानगरपालिका आयुक्तांची भेट घेऊन
सविस्तर चर्चा करून निवेदन सादर केले. निवेदनात त्यांनी म्हटले आहे की,
जालना शहराची लोकसंख्या पाच लाखांहून अधिक झाली असून नवीन जालना परिसरात
नागरिकांसाठी एकही मोठे उद्यान किंवा खेळाचे मैदान उपलब्ध नाही. विद्यमान
छत्रपती संभाजी महाराज उद्यान आकाराने लहान असून तेही नवीन जालना
परिसरातील नागरिकांसाठी दूर आहे.
मंठा चौफुली येथील एसआरपीएफ पेट्रोल पंप ते सिंदखेड राजा रोड दरम्यान
एसआरपीएफची सुमारे १५० ते २०० एकर मोकळी जमीन असून त्यापैकी २५ एकर जागा
शहर विकास आराखड्यात उद्यानासाठी आरक्षित आहे. या जागेवर सुमारे २० एकर
क्षेत्रात भव्य उद्यान, तर उर्वरित ५ एकर क्षेत्रात खेळाचे मैदान, जलतरण
तलाव, सुसज्ज सभागृह व नाट्यगृह उभारण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली.
या प्रकल्पासाठी नगर विकास विभागाचा निधी, आमदार अर्जुनराव खोतकर यांचे
सहकार्य तसेच सीएसआर निधीचा उपयोग करून ही विकासकामे पूर्ण करता येतील,
असा विश्वास अंबेकर यांनी व्यक्त केला.
प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर त्याची देखभाल मूळ जमीनमालक असलेल्या
एसआरपीएफकडे सोपविल्यास उपलब्ध मनुष्यबळामुळे उद्यानाची उत्तम निगा राखली
जाईल. त्यामुळे महिला, मुली आणि नागरिकांना सुरक्षित वातावरण मिळेल. तसेच
नाममात्र प्रवेश शुल्क आकारल्यास त्यातून होणाऱ्या उत्पन्नातून देखभाल व
प्रशासकीय खर्च भागविता येईल, असेही त्यांनी नमूद केले.
शहरात मोठ्या मैदानांचा अभाव असल्याने खेळाडूंना सरावासाठी तसेच विविध
क्रीडा स्पर्धांच्या आयोजनासाठी योग्य सुविधा उपलब्ध नाहीत. तसेच मा.
कृष्णाराव फुलंब्रीकर नाट्यगृह बंद असल्याने या ठिकाणी आधुनिक नाट्यगृह
उभारल्यास शहराच्या सांस्कृतिक विकासालाही चालना मिळेल. हा प्रस्ताव
सभागृहासमोर आल्यास सर्वपक्षीय नगरसेवक त्यास निश्चितच पाठिंबा देतील आणि
या प्रकल्पामुळे जालना शहराच्या वैभवात मोलाची भर पडेल, असेही अश्विन
अंबेकर यांनी सांगितले.
दरम्यान, महानगरपालिका आयुक्तांनी या निवेदनास सकारात्मक प्रतिसाद देत
आरक्षणाची माहिती तपासून लवकरच सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करून तो
मंजुरीसाठी सभागृहासमोर ठेवण्यात येईल, असे आश्वासन दिले.
यावेळी माजी नगरसेवक तथा माजी शहरप्रमुख बाला परदेशी, नगरसेवक दुर्गेश
काठोटीवाले यांनीही विविध विकासकामांबाबत सूचना मांडल्या. प्रसंगी हर्षद
खाकीवाले, गणेश लाहोटी, नरेश जांगडे, अजय म्हस्के, अर्जुन भगत, बंडू
केळकर, परमेश्वर वाघमारे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.























