सांगोला- सांगोल्यातील उत्कर्ष प्राथमिक विद्यालयात आषाढी एकादशी निमित्त आयोजित करण्यात आलेली बालदिंडी भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. कार्यक्रमाच्या प्रारंभी शिक्षिका पल्लवी भंडारे यांनी आषाढी एकादशीचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी संत, श्री विठ्ठल-रुक्मिणी तसेच वारकरी यांची आकर्षक व पारंपरिक वेशभूषा परिधान करून वारकरी संप्रदायाची भक्तिमय परंपरा साकारली. विद्यार्थ्यांच्या हस्ते पालखी पूजन व विठुरायाची आरती करण्यात आली. यावेळी इ.१ लीने चंद्रभागेच्या तिरी, इ.२ रीने हरिनामाची शाळा भरली, इ.३ रीने अशी पंढरी पंढरी तर इ.४ थीने या पंढरपुरात सोन्याचं बाशिंग या गीतांवर नृत्य सादर केले. या विद्यार्थ्यांना संगीत शिक्षिका शुभांगी कवठेकर यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला संस्थेच्या अध्यक्षा दमयंती कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. मुख्याध्यापिका विश्रांती मागाडे, उपमुख्याध्यापिका स्वराली कुलकर्णी यांनी कार्यक्रमासाठी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन शिक्षिका वर्षा रास्ते यांनी केले. भक्तीमय वातावरणात संपन्न झालेल्या या बालदिंडीमुळे विद्यार्थ्यांना वारकरी परंपरा, भक्ती आणि संस्कार यांची सुंदर ओळख झाली.