सोलापूर – मित्रांच्या पाठीमागे लागून बकरी ईदची बाशी ईद साजरी करण्यासाठी हिप्परगा तलाव येथे गेलेल्या एका 28 वर्षीय तरुणाचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता हिप्परगा तलावाच्या टावर क्रमांक दोन येथे घडली .
मोहसीन रफिक शेख ( वय 28 वर्ष , रा . विष्णुनगर , नई जिंदगी सोलापूर ) असे त्या मयत तरुणाचे नाव आहे
गुरुवार रोजी बकरी ईद साजरी झाली होती .त्या ईदची बाशी ईद साजरी करण्यासाठी आज शुक्रवारी दुपारी गल्लीमधील काही मित्र रिक्षामधून पुढे गेले तर मयत मोहसीन हा मोटरसायकल वरून रिक्षाचा पाठलाग करत त्यांच्या मागे मागे हिप्परगा तलाव येथे पोहोचला . त्यानंतर सर्व मित्रांनी मिळून डान्स केला , फोटोही काढले ,जेवण हॉटेलमध्ये जाऊन करण्याचे ठरले होते . तेव्हा तेथील काही स्थानिक लोकांनी या टावर जवळ पोहू नका , 70 ते 80 फूट पाण्याची खोली असल्याचे सांगून ते निघून गेले होते .त्यानंतर मोहसिन हा कपडे काढून पोहण्या साठी तलावात उतरू लागला असता इतर मित्रांनी ही मोहसीनला पोहण्यास विरोध गेला . तरी देखील तो पाण्यात उतरलाच . आणि पाणी खोल असल्याने तो पाण्यात बुडू लागला . तेव्हा दोघा मित्रांनी त्याला वाचविण्यासाठी पाण्यात उतरले तेव्हा तेही पाण्यात बुडू लागले तेव्हा काठावरील एका मित्राने हात देऊन दोघा मित्रांना बाहेर ओढले .दरम्यान मोहसिन हा पाण्यात बुडाला गेला . त्यातील एकाही मित्रास पोहण्यास येत नव्हते . त्यामुळे कोणीही मोहसीनला पाण्यातून बाहेर काढण्यासाठी हिंमत केली नाही .त्यानंतर त्यांनी आरडाओरडा केला असता आसपासच्या लोक जमा झाले .दरम्यान ही माहिती तळे हिप्परगा येथील ग्रामपंचायत शिपाई बंटी पाटोळे यांनी मोबाईल द्वारे सोलापूर तालुका पोलिसांना दिली . तेव्हा सहाय्यक फौजदार बाणेकर व सिविल हॉस्पिटल चे रुग्ण सेवक लादेन यांनी घटनास्थळी पोचून सदरचा मृतदेह पाण्यातून शोधून सायंकाळी सव्वा सहा पर्यंत वरती काढला . त्यानंतर घटनेचा पंचनामा करून सदरचा मृतदेह शवविच्छेदनासाठी येथील शासकीय रुग्णालयात संध्याकाळी साडेसात वाजता दाखल करण्यात आला .दरम्यान ही दुःखद बातमी समजताच नातेवाईक व गल्लीतील मित्रमंडळी नी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मोठी गर्दी केली होती .यावेळी नातेवाईकांनी मोठा आक्रोश केला .
चौकट –
मयत मोहसीन हा नई जिंदगी येथील मौलाना आझाद चौक येथे दानिश पान दुकानात भावाकडे काम करायचा . त्याच्या पश्चात आई , पत्नी , दोन मुले , चार भाऊ ,दोन विवाहित बहिणी असा परिवार असून सध्या मयत मोहसिन ची पत्नी सात महिन्याची गरोदर असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली .
चौकट – मोहसीनला हुलकावणी देत मित्रमंडळी रिक्षातून पुढे गेले होते
मोहसीन हा दारू पिऊनच गल्लीत आला होता . त्यामुळे हिप्परगा येथे जाणारे मित्र त्याला हुलकावणी देत रिक्षातून पुढे निघून गेले होते . मात्र तरी देखील मोहसिन हा त्यांच्या पाठीमागे दुचाकीवरून एका मित्राला घेऊन त्या ठिकाणी पोहोचला अशी माहिती एका मित्राने दिली .
Post Views: 8