सोलापूर – रक्तदान हा सर्वश्रेष्ठ समाजोपयोगी उपक्रम असून सामाजिक मंडळे व युवक संघटनांनी अशा उपक्रमांचे सातत्याने आयोजन करावे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मोहोळ तालुकाध्यक्ष अण्णासाहेब पाटील यांनी केले.
कुरूल येथील मारुती मंदिर परिसरात छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त स्वाभिमानी शेतकरी संघटना व नितीन मस्के यांच्या पुढाकारातून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मोहोळ तालुका युवक अध्यक्ष नितीन मस्के, पप्पू पाटील, व महादेव कदम यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक चंद्रसेन (बापू) जाधव यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मोहोळ तालुकाध्यक्ष अण्णासाहेब पाटील , पंचायत समिती सदस्य धनाजी माळी, प्रगतशील बागायतदार गुरुदेव पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मोहोळ तालुकाध्यक्ष श्रीपती डुणे, पोलीस पाटील वैभव जाधव, प्रा. माऊली जाधव, दत्ता निकम, पांडुरंग घोडके, राहुल पाटील, माणिक घोडके, विकास पवार, रवी शिंदे, बाळू शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
सोलापूर रक्तपेढीच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात युवकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत रक्तदान केले. एकूण ८६ रक्तदात्यांनी सहभाग नोंदवून सामाजिक बांधिलकी जपल्याबद्दल उपस्थित मान्यवरांनी त्यांचे कौतुक केले. तसेच युवकांनी समाजोपयोगी उपक्रमांमध्ये पुढाकार घ्यावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
























