बार्शी – जीवनातील अविद्या, सांसारिक भयातून मुक्ती आणि जिवा-शिवाच्या भेटीसाठी सत्संग नावाच्या सूर्योदयाची जशी आवश्यकता आहे तशी किंबहुना त्याहीपेक्षा अधिक साधू संतांचा सत्संग महत्त्वाचा आहे. कारण सूर्योदयाला सूर्यास्त आहे पण साधू संतांच्या सत्संगाचा कधी अस्तंच होत नाही अशा शब्दात ह.भ.प. जयवंत बोधले महाराजांनी साधु-संत सत्संगतीचे माहात्म्य स्पष्ट केलेआहे.
प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी ग्रामदैवत श्री भगवंता मंदिरामध्ये चालू असलेल्या आपल्या श्रावणमासीय प्रवचन मालेत यंदाच्या श्रीमद् भागवत कथा भाग २ या विषयावरील तिसऱ्या दिवशीच्या निरुपणात बोधले महाराज बोलत होते.
आपल्या प्रवचन मालेच्या निरुपणात सुरुवातीला पूर्वसूत्र स्पष्ट करताना उद्धव-विदुर कोण होते? त्यांचा अधिकार काय? श्रीमद् भागवत ग्रंथामधील तत्त्वज्ञानाचा कोणा-कोणामध्ये संवाद झाला? उद्धव आणि विदुर या दोन कृष्ण भक्तांची भेट झाली कोठे? यासारखे असंख्य प्रश्न उपस्थित करुन त्यांचे निराकरण करताना आपल्या विषय विस्तारात महाराज म्हणाले, श्रीकृष्णाच्या अंतःकरणात घडणाऱ्या घटनांचं ज्या ग्रंथावरुन ज्ञान होतं तो श्रीमद् भागवत ग्रंथ होय. स्थित्तप्रज्ञ उद्धव ही श्रीकृष्णाची उत्सव मूर्ती आहे. म्हणून निजधामाला जाताना श्रीकृष्णांनी अध्यात्मज्ञान केवळ उद्धवाला सांगितले.
उद्धव आणि मैत्रेय यांच्यामधील हा उत्कट संवाद ऐकण्याच्या उदात्त उत्कंठेने पछाडलेल्या विदुरास तो संवाद ऐकण्याची तीव्र इच्छा झाली. पण उद्ववाची भेट कोठे होईल या विवंचनेत असतानाच विदुराना दुर्योधनाने हाकलून दिल्याने उद्विग्न मनाने त्यानी तीर्थयात्रेस जाण्याचा निर्णय घेतला. कर्म-धर्म संयोगाने यमुनातीरी विदुरांची आणि उद्धवांची भेट झाली. त्यांनी एकमेकांना अलिंगन दिले. श्रीकृष्ण कोठे आहेत यावर उद्धवांनी ते निजधामाला गेले असल्याचे सांगितले. त्याचबरोबर ते निजधामाला जाताना त्यांनी तुझी आठवण काढली. किंबहुना ते तुझीच वाट पाहात होते. तुला त्यांनी मैत्रेय आणि माझ्यामधील तत्त्वज्ञान विषयक संवाद ऐकून घ्यायची, जाणून घ्यायची इच्छा असेल तर तुला गंगातटी मैत्रेय यांची भेट घ्यायला सांगितले असल्याचे बोधले महाराजांनी शेवटी स्पष्ट केले.
Post Views: 7