बार्शी – तालुक्यातील शेलगाव (मा.) येथे सुरु असलेल्या बेकायदा जुगार अड्ड्यावर बार्शी तालुका पोलिसांनी रविवार दि. १६ ऑगस्ट रोजी धडक कारवाई केली. धाराशिवकडे जाणाऱ्या रस्त्यालगत चिंचेच्या झाडांच्या आडोशाला सुरु असलेल्या ‘मन्ना’ नावाच्या जुगारावर पोलिसांनी छापा टाकत सातजणांना ताब्यात घेतले. या कारवाईत रोख रक्कम, जुगाराचे साहित्य तसेच दुचाकी वाहने असा एकूण ३ लाख ५७ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिसांना शेलगाव (मा.) हद्दीत धाराशिवकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला असलेल्या चिंचेच्या झाडीखाली काही व्यक्ती बेकायदा जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. माहितीची खातरजमा केल्यानंतर बार्शी तालुका पोलिसांच्या पथकाने तातडीने नियोजन करुन संबंधित ठिकाणी छापा टाकला.
पोलिसांचे पथक अचानक घटनास्थळी दाखल होताच जुगार खेळणाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली. पोलिसांनी घटनास्थळी जुगार खेळत असलेल्या सातजणांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून जुगाराचे साहित्य, रोख रक्कम आणि विविध दुचाकी वाहने असा एकूण ३ लाख ५७ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी बार्शी तालुका पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम १२ (अ) अन्वये गुन्हा रजिस्टर क्रमांक २६०/२०२६ दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईत ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तीमध्ये अमोल ऊर्फ बालाजी बब्रुवान काळे (वय ३२), सुनील माणिक मारकड (वय ३६), रमेश सिद्धाराम खांडेकर (वय ६०), नंदकुमार उत्तम माळी (वय ३८), काका ऊर्फ लक्ष्मीकांत व्यंकटेश मारकड (वय ४४), आकाराम गंगाधर शिंदे (वय ५५) आणि दिलीप ऊर्फ रमेश वैजिनाथ काळे (वय ३९) यांचा समावेश आहे. हे सर्व शेलगाव (मा.), ता. बार्शी येथील रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही कारवाई सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक आबासाहेब शिरगिरे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अंमलदार अमृत खेडकर, प्रदीप चौधरी, सागर वाकळे, शिवशंकर खराडे, कावळे आणि अमृता गुंड यांच्या पथकाने ही कारवाई केली.
शेलगाव परिसरात सुरु असलेल्या बेकायदा जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून, अशा प्रकारच्या अवैध व्यवसायांविरोधात पोलिसांची कारवाई सुरूच राहणार असल्याचे संकेत या कारवाईतून मिळत आहेत.