ओडिशात मुसळधार पाऊस आणि वीज पडून 12 जणांचा मृत्यू झाला तर 14 जण जखमी झाले आहेत. ओडिशाच्या भुवनेश्वर, कटकसह अनेक भागात मुसळधार पावसासह वीज पडण्याची घटना घडली आहे. हवामान खात्याने पुढील 4 दिवस राज्यातील इतर भागातही मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
राज्यात शनिवारी विजेमुळे खुर्दा येथे चार, बोलंगीरमध्ये दोन, अंगुल, बौध, जगतसिंगपूर आणि ढेंकनालमध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. ओएसडीएमए (ओडिशा राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण) नुसार, भुवनेश्वरमध्ये 126 मिमी आणि कटकमध्ये दुपारी 95.8 मिमी पावसाची नोंद झाली आहे. ओडिशातील नबरंगपूर, कालाहंडी, नुआपाडा, रायगडा, गंजम, गजपती, कंधमाल, नयागड, बालंगीर, सोनपूर, बौध यासह अनेक जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस, गडगडाटी वादळ आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. यासाठी विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मलकानगिरी, कोरापुट, झारसुगुडा, सुंदरगढ, पुरी आणि जगतसिंगपूरमध्ये पाऊस, वादळ आणि वीज पडण्याचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
]
हवामान खात्याने जारी केलेल्या अखिल भारतीय हवामान बुलेटिननुसार, ईशान्य बंगालच्या उपसागरात आणि आसपास चक्रीवादळ अस्तित्वात आहे. त्याच्या प्रभावाखाली पुढील 48 तासांत वायव्य आणि लगतच्या पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, येत्या 5 दिवसांत उत्तर भारत, ओडिशा आणि छत्तीसगडमध्ये मान्सून सक्रिय होईल. त्यामुळे या भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.