पंढरपूर – वाडीकुरोली येथील वसंतराव काळे प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुलींच्या संघाने व सन फार्मा विद्यालय अहिल्यानगरच्या मुलांच्या संघाने पुणे विभागीय शालेय खो-खो स्पर्धेचे १७ वर्षांखालील गटाचे विजेतेपद पटकाविले.
वसंतराव काळे प्रशालेच्या मैदानावर झालेल्या
मुलींच्या अंतिम सामन्यात वाडीकुरोलीच्या मुलीनी पिंपरी-चिंचवड संघाचा 9-8 असा एक डाव व एक गुणाने पराभव केला. प्रशिक्षक अतुल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय खेळाडू स्नेहा लामकाने, कल्याणी लामकाने, कार्तिकी यलमार, श्रेया यलमार, भक्ती चौधरी आणि कोमल पासले यांनी अष्टपैलू खेळ करत संघाला मध्यंतरासच 9-3 अशी भक्कम आघाडी मिळवून दिली. ही आघाडीच त्यांना डावाने विजय मिळवून दिली. ऋतुजा सुरवसे, श्रावणी देठे, श्रावणी कस्तुरे, संध्याराणी घाडगे, तृप्ती सावंत, आलिया मुलाणी व तेजश्री मोरे यांनी धारदार आक्रमण करत विजयात मोलाचे योगदान दिले.
मुलांच्या गटात शेवटच्या क्षणापर्यंत झालेल्या चुरशीच्या सामन्यात सन फार्मा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय अहिल्यानगरने महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी मुलांचे विद्यालय पुणे संघावर 15-14 अशी एका गुणाने निसटती मात केली. मध्यंतराची 9-8 ही आघाडीच त्यांना विजय मिळवून दिली.
महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे यांच्या वतीने तसेच सोलापूर जिल्हा क्रीडा परिषद आणि खो-खो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन केले होते. पारितोषिक वितरण समारंभ उद्योजक संजय अवताडे, विठ्ठल चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष युवराज पाटील, श्रीराम शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष कल्याणराव काळे, सचिव बाळासाहेब काळे , सोलापूर खो-खो असोसिएशनचे उपाध्यक्ष अजितकुमार संगवे, सचिव उमाकांत गायकवाड, पंच मंडळ सचिव मोहन रजपूत, तालुका क्रीडा अधिकारी राहुल गायकवाड, अनिल नागटिळक, संजय मासाळ, प्राचार्य संजय कुलकर्णी, पर्यवेक्षक के. एम. गाजरे यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आली
———चौकट——-
अंतिम प्रथम तीन संघ
१७ वर्षांखालील – मुली : सोलापूर ग्रामीण (वसंतराव काळे प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय, वाडीकुरोली) पिंपरी-चिंचवड, (श्री सयाजीनाथ महाराज विद्यालय वाडमुखवाडी, पिंपरी चिंचवड) अहिल्यानगर ग्रामीण.
मुले : अहिल्यानगर ग्रामीण (सन फार्मा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय अहिल्यानगर), पुणे शहर( महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी मुलांचे विद्यालय पुणे) सोलापूर ग्रामीण ( मरवाडे ).
———- चौकट—–
पारदर्शक व निष्पक्ष वातावरणात स्पर्धा
पुणे विभागीय खो-खो स्पर्धा पारदर्शक आणि निष्पक्ष पद्धतीने पार पडाव्यात, यासाठी संयोजन समितीच्या वतीने महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशनच्या सहकार्याने पुणे विभागाबाहेरील पंचांची नियुक्ती करण्यात आली होती. पंचप्रमुख रफिक शेख व त्यांच्या पंचमंडळाने संपूर्ण स्पर्धा निष्पक्षपणे पार पाडण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
—–



















