प्रधानमंत्री स्वनिधी योजने अंतर्गत १४१ पथविक्रेते तसेच छोट्या व्यावसायिकांना प्रत्येकी दहा हजार रुपयांचा लाभ मिळाला. माजी पालकमंत्री आ. विजयकुमार देशमुख यांच्या पुढाकाराने राबवलेल्या या योजनेतील लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप माजी नगरसेवक डॉ. किरण देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. शेळगी येथील वैष्णवी हॉलमध्ये हा कार्यक्रम झाला.
याप्रसंगी डॉ. देशमुख म्हणाले, पथविक्रेते छोट्या व्यावसायिकांना आपला व्यवसाय सुरू करण्यासाठी, व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी विनातारणी १० हजार रुपये कर्जरूपाने देण्याची योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केली आहे. देशभरातील हजारो छोटे व्यवसायिक याचा लाभ घेत आहेत. सोलापुरातील इच्छुक विक्रेत्यांनीही याचा लाभ घेण्यासाठी कार्यालयाशी संपर्क साधावा. पहिल्यावेळी देण्यात आलेल्या १० हजार रुपयांची परतफेड वेळेत केली. तर, दुसऱ्यावेळी २० हजार रुपये तर त्यानंतरच्या टप्प्यात तब्बल ५० हजार रुपयांचे कर्ज मिळणार आहे. अशा अनेक योजना मिळवून देण्यासाठी भाजपाचे कार्यकर्ते कायम तत्पर आहेत. त्याचा विक्रेत्यांनी नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही डॉ. किरण देशमुख यांनी याप्रसंगी केले.

















