भोकरदन : जालना येथील दिव्यांग वित्त विभाग महामंडळाला कायमस्वरूपी व्यवस्थापक नसल्याने दिव्यांग लाभार्थ्यांना समस्यांचा सामना करावा लागत आहे.
दरम्यान, जिल्ह्याचे पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांनी तात्काळ लक्ष घालून कायमस्वरूपी व्यवस्थापक द्यावा अशी मागणी भोकरदन तालुक्यातील बरंजळा साबळे येथील रहिवासी व भाजपा दिव्यांग संघटनेचे जिल्हाध्यक्ष नायबराव पाटील कडवणे यांच्यावतीने करण्यात आली आहे.
दिव्यांग व्यक्तींना शासनाच्या विविध योजनांचा लाभ होण्यासाठी जालना येथे स्वतंत्र दिव्यांग वित्त विभाग महामंडळ आहे. परंतु मागील दोन ते तीन महिन्यांपासून स्वतंत्र जिल्हा व्यवस्थापक नाही. महात्मा फुले विकास महामंडळाच्या व्यवस्थापकाकडे सध्या तात्पुरता पदभार देण्यात आला आहे. विशेष म्हणजे त्यांच्याकडे ईतर जिल्ह्यांचाही पदभार असल्याने ते दिव्यांग महामंडळाकडे लक्ष देऊ शकत नाहीत. परिणामी दिव्यांगाच्या मात्र अडचणी निर्माण होत आहेत.
सध्या दिव्यांग महामंडळात केवळ श्री जाधव हे अत्यंत प्रामाणिकपणे काम करीत आहेत परंतु ते कंत्राटी कामगार असल्याने त्यांना कोणताच अधिकार नाही. कमीतकमी त्यांना अधिकार तरी द्यावा किंवा तात्काळ कायमस्वरूपी व्यवस्थापकांची नेमणूक करावी अशी मागणी ही नायबराव कडवणे यांनी केली आहे.
दरम्यान, काही दिव्यांग लाभार्थ्यांच्या फाईल मंजूर आहेत काहींच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. परंतु त्यांच्या धनादेशावर सही झालेली नसल्याने दिव्यांग बांधव कार्यालयात हेलपाटे मारून मारून कंटाळल्याचे चित्र दिसून येत आहे.
























