तभा फ्लॅश न्यूज/सोलापूर : शिक्षकांच्या शालार्थ आयडी देण्याच्या प्रकरणामध्ये काही अधिकार्यांनी अनियमितता करून भ्रष्टाचार केलेल्याचा ठपका ठेवून राज्यातील अनेक अधिकाऱ्यांना अटक केल्याच्या निषेधार्थ अखिल महाराष्ट्र शिक्षण सेवा राजपत्रित अधिकारी संघटनेने पुकारलेल्या बेमुदत रजा आंदोलनात जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक, निरंतर शिक्षण अधिकाऱ्यांसह, उपशिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी सहभागी झाल्याने जिल्ह्यातील शिक्षण विभागाचा कारभार ठप्प झाला आहे.
शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांनी सहभाग नोंदवत एक दिवसाची रजा घेऊन शुक्रवारी आंदोलनात सहभाग नोंदवला. शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांकडून जिल्हा परिषद प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांना निवेदन देऊन आंदोलनास पाठिंबा देण्यात आला.
पवित्र पोर्टल मार्फत झालेली शिक्षक भरती आणि त्यांचे शालार्थ, शिक्षिकेतर कर्मचाऱ्यांच्या मान्यता, अल्पभाषिक व अल्पसंख्यांक शाळांमधील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मान्यता, सेवक संच दुरुस्ती अशी अनेक कामे सध्या प्रलंबित असताना अधिकाऱ्यांच्या अटक सत्रामुळे कोणतेही अधिकारी नियमित असणारी कामेही करायला सध्या धजावत नाहीत. हा प्रकार सुरू असताना शिक्षण विभागातील प्रमुख अधिकाऱ्यांच्या बेमुदत आंदोलनाची ठिणगी पडल्याने राज्यातील शिक्षण विभागाचा कारभार सध्या तरी ठप्प झाला आहे.
Post Views: 184