छत्रपती संभाजीनगर / कन्नड – शहरातील श्रीराम कॉलनीत सोमवारी रात्री अकराच्या सुमारास भीषण आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली!
घुगे कुटुंबाच्या घरात शॉर्टसर्किटमुळे अचानक आग भडकली, आणि क्षणात संपूर्ण घर जळून राख झालं! त्या वेळी घरात वृद्ध वाणाबाई गोविंद घुगे (वय ६०) एकट्याच होत्या.
आग वाढत चालल्याने घरात शिरणं अशक्य होतं.
मात्र स्थानिकांनी धाडस दाखवत मागचं दार फोडून आत प्रवेश केला आणि आजींचा जीव वाचवला!
अग्निशमन दलाने तात्काळ धाव घेत तब्बल अर्धा ते पाऊण तास शर्थीचे प्रयत्न करून आग नियंत्रणात आणली. मात्र तोपर्यंत जीवनावश्यक वस्तू, फर्निचर, कपडे, धान्य, कागदपत्रे सर्व राख झाली होती.

या घटनेत गोविंद काळू घुगे (६५), वाणाबाई (६०), राजेंद्र (४०), संतोष (३२) आणि कुंतीका (२५) या कुटुंबाचे मोठे नुकसान झाले आहे. हे सर्व भाजीपाला विक्री करून उदरनिर्वाह करणारे कुटुंब असून, आता त्यांच्या डोळ्यांसमोर फक्त राखच उरली आहे.


















