सोलापूर – स्थानिक ए. जी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, तांत्रिक कौशल्ये आणि समस्या निवारण क्षमतांना वाव देण्यासाठी ‘अंतर्गत स्मार्ट इंडिया हॅकेथॉन’चे (Internal Smart India Hackathon) उत्साहात आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत विविध विभागांतील सुमारे ४० संघांमधून २४० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून आपल्या कौशल्याचे सादरीकरण केले.
या हॅकेथॉनमध्ये विद्यार्थ्यांनी विविध सामाजिक व तांत्रिक आव्हानांवर नाविन्यपूर्ण आणि तंत्रज्ञानाधारित उपाय सादर केले. विद्यार्थ्यांनी आपल्या प्रकल्पांमधून सर्जनशील विचारसरणी, तांत्रिक सक्षमता, टीमवर्क आणि समस्या निराकरणाच्या क्षमतेचे प्रभावी प्रदर्शन घडवले.
स्पर्धेचे परीक्षक म्हणून डॉ. पी. एम. गव्हाणे, श्री. नरेंद्र मेरगू आणि श्री. संतोष गावडे यांनी काम पाहिले. त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रकल्पांची नाविन्यता, तांत्रिक अंमलबजावणी, व्यवहार्यता आणि सामाजिक उपयुक्तता या निकषांवर मूल्यमापन करून विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला संगणक अभियांत्रिकी विभागप्रमुख प्रा. एस. व्ही. कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. प्राचार्य डॉ. व्ही. व्ही. पोतदार यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी शुभेच्छा देत प्रेरणा दिली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील ‘स्मार्ट इंडिया हॅकेथॉन’साठी आवश्यक अनुभव मिळून त्यांच्यातील संशोधन वृत्ती आणि उद्योजकीय दृष्टिकोन वाढीस लागण्यास मदत होणार आहे.
कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष श्री. एस. ए. पाटील, विश्वस्त श्री. एस. एस. पाटील यांचे प्रोत्साहन तसेच कॅम्पस डायरेक्टर डॉ. एम. ए. चौगुले यांचे मार्गदर्शन लाभले.
याप्रसंगी ई अँड टीसी (E&TC) विभागप्रमुख प्रा. एस. जे. लिगाडे, मेकॅनिकल विभागप्रमुख डॉ. एस. बी. गदवाल, सिव्हिल विभागप्रमुख प्रा. टी. डी. मसलेकर आणि प्रथम वर्ष समन्वयक प्रा. आर. एम. पंतोजी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी समन्वयक प्रा. ए. बी. वळसंग यांच्यासह संगणक अभियांत्रिकी विभागातील सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
Post Views: 20