सोलापूर – ज्या शाळांमध्ये ५ वी ते १० वी असे ६ वर्ग असतील तेथे कला शिक्षक देण्यात येणार असल्याचा महत्त्वाचा निर्णय राज्याचे कला संचालक डॉ. किशोर इंगळे यांनी घेतला आहे.
कला विषयाला आणि कला शिक्षकांना चांगले दिनमान मिळवून देण्यासाठी संचालनालय कटिबद्ध असून, झालेला हा महत्त्वपूर्ण निर्णय कला शिक्षकांसाठी अत्यंत आशादायी ठरला आहे. कला संचालनालय व कला शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी कला शिक्षण मंडळाचे संचालक विनोद दांडगे, सचिव सौ. किंकाळे आणि परीक्षा नियंत्रक वाघमोडे उपस्थित होते. मुंबई येथे राज्यातील कला शिक्षकांच्या विविध समस्यांवर सखोल चर्चा करण्यात आली. भविष्यात शासकीय चित्रकला परीक्षा पद्धतीत विद्यार्थी व शिक्षक हिताचे अनेक सकारात्मक बदल केले जाणार आहेत.अखिल महाराष्ट्र राज्य शैक्षणिक कला शिक्षक संघाचे अध्यक्ष शेरशहा डोंगरी आणि सचिव एस. डी. भिरुड यांनी कला शिक्षकांच्या अडचणी मांडल्या. या बैठकीत शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षेच्या कामकाजातील अडीअडचणी, परीक्षा पद्धत, मानधन आणि ट्रॅव्हलिंग अलाउन्स या प्रमुख मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली. डॉ. किशोर इंगळे यांनी सर्व मागण्या ऐकून घेत अनेक प्रश्नांवर तातडीने सकारात्मक प्रतिसाद दिला.
या बैठकीस कला शिक्षक संघटनेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष शशिकांत सदाफुले, ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष एल. पी. पाटील, सहसचिव वासुदेव वैद्य, जळगाव जिल्हा अध्यक्ष अरुण सपकाळे, आणि राज्य खजिनदार आर. डी. चौधरी यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
——






















