पंढरपूर – पंढरपूरमध्ये लक्ष्मण हाके यांच्या दौऱ्या दरम्यान मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांशी शाब्दिक वाद झाला. “एक मराठा लाख मराठा” च्या घोषणांमुळे वातावरण तापलं आणि परिस्थिती हाताबाहेर गेली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने हाणामारी सारखा मोठा अनर्थ टाळला.
या घटनेबाबतची सविस्तर माहिती अशी की, ओबीसीचे नेते लक्ष्मण हाके हे शुक्रवारी (ता.७) पंढरपूर दौऱ्यावर आले होते. या दौऱ्या दरम्यान येथील विश्रामगृहावर मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी हाके यांना पाहून घोषणाबाजी सुरु केली. “एक मराठा लाख मराठा, जरांगे पाटील आगे बढो” अशी घोषणाबाजी सुरु असताना मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वय धनाजी साखळकर आणि लक्ष्मण हाके यांच्यामध्ये शाब्दीक वादावादी झाली.
दरम्यान हा वाद टोकाला गेल्याने लक्ष्मण हाके आणि मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून गेले. या दरम्यान वाद चिघळल्याने दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये हमरीतुमरी सुरु झाली. प्रसंगाचं गांभीर्य पाहून लक्ष्मण हाके यांनी पोलिसांना बोलावून घेतले. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळाला.
——————–
जरांगे यांनी मिडिया ट्रायल बंद करावी : हाके
धनंजय मुंडे यांच्यावर मनोज जरांगे यांनी आजच्या पत्रकार परिषदेत आरोप केल्यानंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी जरांगे यांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. लक्ष्मण हाके म्हणाले, “जरांगे यांनी उपस्थित केलेल्या मुद्दे आणि आरोपांवर गृह विभाग तपास करेलच. धनंजय मुंढे असे काही करतील असे वाटत नाही. जरांगे यांनी मिडिया ट्रायल बंद करावी असा टोला हाके यांनी लगावला.
———————-
प्रसंगी महाराष्ट्र बंद करु : साखळकर
दरम्यान सामाजिक क्षेत्रात काम करणारे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचल्याची गंभीर बाब उघडकीस आली आहे. यानंतर मराठा समाज आक्रमक झाला आहे. यामागचा मास्टर माईंड लवकरात लवकर शोधून काढावा अन्यथा मराठा समाज राज्यात तांडव केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी दिला. शिवाय प्रसंगी महाराष्ट्र देखील बंद करू असा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक धनाजी साखळकर यांनी दिला आहे.

























