परभणी / पूर्णा – पूर्णा नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकाची आदर्श आचारसंहिता लागू झाली असून सर्वांनी आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन निर्वाचन अधिकारी तथा तहसीलदार माधवराव बोथीकर यांनी केले.
शुक्रवारी पूर्णा तहसील कार्यालयात दुपारी निवडणुकीच्या अनुषंगाने माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सहाय्यक निर्वाचन अधिकारी प्रशांत थारकर नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. उत्कर्ष गुट्टे आदी उपस्थित होते याप्रसंगी निर्वाचन अधिकारी तथा तहसीलदार माधवराव बोथीकर यांनी पूर्णा नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक माहिती पत्रकारांना सांगितली.
पूर्णा नगरपालिका निवडणुकीसाठी एकूण ११ प्रभाग राहणार असून यातून २३ सदस्य निवडले जाणार आहे तर नगराध्यक्ष पदाची निवडणूक थेट जनतेतून केली जाणार आहे या निवडणुकीसाठी एकूण ३३ हजार ७७६ मतदार असून यामध्ये १६६८५ पुरुष तर १७ हजार ९१ महिला मतदार आहेत.
शहरात एकूण निवडणुकीसाठी ३८ बूथ निर्माण करण्यात आले आहे तर चार झोनल अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे तसेच आचार संहिता पथक प्रमुख म्हणून पूर्णा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नारायण मिसाळ यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती तहसीलदार बोथीकर यांनी सांगितले.





















