सोलापूर – विधानसभा निवडणुकीनंतर माढा तालुक्यातील जनतेमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून, येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये तालुक्यातील सर्व जागांवर भाजपच विजय मिळवेल, असा विश्वास सोलापूर जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह शिंदे यांनी व्यक्त केला.
मोडनिंब (ता.माढा) येथे झालेल्या भाजपा पदाधिकारी कार्यकारिणीच्या वतीने रणजितसिंह शिंदे यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले. यावेळी कार्यकर्ता विचार सभेत ते बोलत होते.पुढे बोलताना शिंदे यांनी सांगितले की, नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांनी जनतेचा विश्वास संपादन केला आहे. देशभर विकासकामांचा धडाका सुरू आहे. मागील वर्षभरापासून माढा तालुका विकासकामांच्या बाबतीत मागे पडत आहे. तालुक्याचा विकास पूर्वपदावर आणण्यासाठी भाजप प्रवेशाचा निर्णय घेतल्याचे शिंदे यांनी सांगितले.
यावेळी समाज कल्याणचे माजी सभापती शिवाजी कांबळे, भाजपचे तालुकाध्यक्ष योगेश पाटील, कैलास तोडकरी, अँड गणेश सुर्वे, राहुल गांधी, मनसे नेते प्रशांत गिड्डे,ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह ग्रामस्थ व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.जैन बांधवांच्या अष्टान्हीक पर्व सिद्धचक्र विधान महामंडळ सोहळ्यास त्यांनी सदिच्छा भेट दिली.
















