सोलापूर : कै. सिद्रामप्पा मल्लप्पा हतुरे यांच्या २०व्या पुण्यस्मरणानिमित्त श्री महात्मा बसवेश्वर प्रतिष्ठानचे संस्थापक श्रीशैल मामा हतुरे यांच्या मार्गदर्शनाखाली कै. सौ. रखमाबाई हतुरे सांस्कृतिक भवन, हतुरे नगर, सोलापूर येथे अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
या सप्ताहाच्या निमित्ताने आज (दि. ७ नोव्हेंबर) ह.भ.प. भागवत महाराज चवरे (पंढरपूर) यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले. या कीर्तनासाठी आंबेकर व अजरेकर फड प्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी संतपूजन श्री बसवराज पनशेट्टी यांच्या हस्ते पार पडले. कीर्तनास मृदंग साथ ह.भ.प. ज्योतीराम चांगभले यांनी, तर गायन साथ ह.भ.प. संजय पवार यांनी दिली.
आपल्या कीर्तनात महाराजांनी “काय नोहे केले, एका चिंतीता विठ्ठले” या अभंगाचे विवेचन करताना सांगितले की, “नामस्मरण ही काळाची गरज आहे. शरीराच्या माध्यमातून पुण्य कमवायचे असेल तर ‘नाम’ घेणे हा सर्वात सोपा मार्ग आहे. हरीपाठ, नामस्मरण व भजन या साधनांद्वारेच समाजाचे भले होऊ शकते.”
कीर्तन कार्यक्रमास मुक्ताई भजनी मंडळ सोलापूर व एस.आर.पी. कॅम्प भजनी मंडळ यांनी आपली सेवा अर्पण केली.कार्यक्रमास माजी नगरसेवक वैभव हतुरे, विरेश हतुरे, ह.भ.प. निवृत्ती महाराज ताकमोगे, सुरेश कामशेट्टी, भीमाशंकर हतुरे, इनामदार काका, शशिकांत वसंतपुरे, डोंगरे, सुरेश वंदले, निंगय्या स्वामी, सचिन याबाजी आदी मान्यवर उपस्थित होते.


















