सोलापूर – ज्ञानियांचे राजे,संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर(माऊली )महाराज यांच्या ७२९ व्या समाधी सोहळ्याचे व ७५०व्या जन्मोत्सव वर्षाचे औचित्य साधून हरिपाठ परिवार सोलापूर यांच्यावतीने सुमारे १०० महिलांच्या उपस्थितीत श्री संत शिरोमणी सावता माळी महाराज समाधी तीर्थक्षेत्र अरण येथे हरिपाठाचा उत्सव संपन्न करण्यात आला.
संत शिरोमणी सावता माळी महाराजांच्या भक्तीची परीक्षा बघण्यासाठी साक्षात पंढरीचा पांडुरंग आरणला सावता महाराजांच्या मळ्यामध्ये दाखल झाले. त्यावेळेला त्यांना शोधत संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व देवाचे लाडके भक्त संत शिरोमणी नामदेवराय हे दोघेही अरण गावी देवाला शोधत त्याठिकाणी आल्यामुळे या त्रिवेणी संगमावरती हा नामजप व्हावा, या धारणेने त्या ठिकाणी हरिपाठ संपन्न करण्यात आला. हरिपाठ सुरुवात करण्यापूर्वी हरिपाठ परिवाराचे प्रमुख बळीराम जांभळे यांच्या हस्ते संत शिरोमणी सावता माळी महाराज समाधीचे पूजन करण्यात आले.
याप्रसंगी सचिन भोसले, चंद्रकांत जांभळे, तुकाराम जांभळे ,गुरुनाथ ताटे ,सौरभ बोंगे, सुरेश जांभळे उपस्थित होते. समाधीचे पूजन झाल्यानंतर हरिपाठ परिवार शाखा लष्कर महादेव मंदिर प्रमुख मनोरमा पट्टमवार व महिलांच्या वतीने ज्ञानेश्वरी ग्रंथाच्या पहिला अध्यायाचे पठण करण्यात आले. श्रीसंत सावता माळी महाराज समाधी ट्रस्टचे अध्यक्ष विठ्ठल गाजरे यांच्यावतीने हरिपाठ परिवाराचे प्रमुख बळीराम जांभळे यांचा सेवा केल्याबद्दल सन्मान करण्यात आला.
दरम्यान, या कार्यक्रमात गायन बळीराम जांभळे महाराज, चंद्रकांत जांभळे,रेखा पवार ,अश्विनी जांभळे, गीता क्षीरसागर ,पुनम व्यवहारे, सुनिता गाढवे, सोनाली केसरे,यांच्यावतीने करण्यात आले. त्यावर मृदंगाची साथ अनिकेत जांभळे , सौरभ बोंगे,समर्थ कांबळे, शंभू महाराज जांभळे ,अंजली लोखंडे ,भक्ती परदेशी यांची लाभली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अविराज जांभळे यांनी प्रयत्न केले.


















