सोलापूर : सोलापूर महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज बुधवारी नॉर्थकोट प्रशाला येथील विविध सात निवडणूक कार्यालयातून एकूण १०३५ नामनिर्देशन अर्जांची विक्री झालेली आहे. मंगळवारी आणि बुधवारी अशा दोन दिवसात एकूण २ हजार १०९ नामनिर्देशन पत्र अर्जांची विक्री झाली आहे. आज माझी नगरसेवकांसह इच्छुक उमेदवारांनी अर्ज नेले आहेत. कोणत्याही उमेदवारांकडून आज एकही अर्ज दाखल करण्यात आला नाही.
सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी दि. २३ ते ३० डिसेंबर २०२५ पर्यंत उमेदवारी अर्ज घेणे आणि स्वीकृतीची मुदत आहे. आज बुधवारी दुसऱ्या दिवशी विविध निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयासमोर अर्ज नेण्यासाठी मोठी गर्दी झाल्याचे दिसून आले. भाजपचे माजी नगरसेवक प्रभाकर जामगुंडे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे रुपेश भोसले यांच्यासह अनेक इच्छुक उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र घेतले केले. काल मंगळवार दि.२३ डिसेंबर रोजी १०७४ अर्ज तर आज बुधवारी १०३५ अर्ज विक्री झाले. दोन दिवसात एकूण २१०९ अर्जांची विक्री झाली आहे. तर दि. २४ डिसेंबर २०२५ रोजी एक खिडकी येथे ना – हरकत प्रमाणपत्रासाठी एकूण २१० अर्ज दाखल झाले आहेत.
बुधवारी नामनिर्देशन अर्ज विक्रीचा
तपशील या प्रमाणे :
निवडणूक निर्णय अधिकारी -१ : १७३
निवडणूक निर्णय अधिकारी -२:१४८
निवडणूक निर्णय अधिकारी-३ : १३१
निवडणूक निर्णय अधिकारी ४ : १४२
निवडणूक निर्णय अधिकारी-५ : १८४
निवडणूक निर्णय अधिकारी-६ : ९०
निवडणूक निर्णय अधिकारी-७ : १६७
आज एकूण १०३५ नामनिर्देशन अर्जांची
विक्री झालेली आहे.
एक खिडकी कक्षात मोठी गर्दी ;
महिलांसाठी वेगळी खिडकी करण्याची गरज
महापालिकेने अर्ज दाखल करताना ज्या एनओसी घेणे गरजेचं आहे. त्यासाठी एक खिडकी योजना महापालिका प्रशासकीय इमारतीमध्ये सुरू केली आहे. या ठिकाणी चार खिडक्यांची सोय करण्यात आली आहे. पालिकेत एक खिडकीवर झुंबड उडाली होती. दरम्यान या ठिकाणी महिलांची ही गर्दी दिसून आली. यामुळे महिलांसाठी वेगळी खिडकी आणि रांग करण्याची गरज वर्तवली जात आहे.
आज सुट्टी असल्याने अर्ज विक्री व स्वीकृती होणार नाही
सोलापूर महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी
अर्ज देणे व स्वीकारण्याची प्रक्रिया दि. 23 ते 30 डिसेंबर 2025 पर्यंत आहे. दरम्यान आज गुरुवार दिनांक 25 डिसेंबर रोजी शासकीय सुट्टी असल्याने नाम निर्देशन पत्र विक्री आणि स्वीकृती करण्यात येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. अर्ज छाननी दि. 31 डिसेंबर 2025 असून त्याच दिवशी वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल. उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी दिनांक 2 जानेवारी 2026 पर्यंत मुदत राहणार आहे. दिनांक 3 जानेवारी रोजी निवडणूक चिन्ह वाटप करण्यात येईल. याच दिवशी अंतिम उमेदवार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. मतदान 15 जानेवारी रोजी होणार आहे. दुसऱ्या दिवशीच 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी व निकाल घोषित करण्यात येणार आहे. दि. 19 जानेवारी 2026 पर्यंत निकाल शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
13.91 लाख किमतीचे 35 हजार
967 लिटर मद्य पदार्थ जप्त
महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने दि. 15 ते 24 डिसेंबर 2025 दरम्यान एक ते 26 प्रभाग क्षेत्र अंतर्गत आचारसंहिता पथकाकडून देशी – विदेशीसह विविध प्रकारचे 13 लाख 91 हजार 175 रुपये किमतीचे 35 हजार 967 लिटर मद्य पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. सोलापूर महापालिका आचारसंहिता अहवालानुसार ही माहिती महापालिका अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांनी दिली.

















