करकंब : विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव प्रयत्नशील असणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जळोली येथे शाळा व्यवस्थापन समिती, पदाधिकारी,माजी विद्यार्थी,माता पालक मेळावा आयोजित करण्यात आला होता.त्यावेळी जळोली गावचे गुरुतल्य व्यक्तिमत्त्व मनोहर महाराज यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आल्यानंतर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले.
जेष्ठ शिक्षक नागनाथ गायकवाड यांनी मेळावा घेण्याच्या उद्देश स्पष्ट करत शाळेचा सर्वांगीण विकासासाठी पालक,विद्यार्थी आणि शिक्षकांचा त्रिकोण साधलाकी शाळेची प्रगती होते म्हणून शाळेच्या भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व पालकांनी अर्थिक सहकार्य करण्याचे आवाहन केले.यावेळी शाळेच्या आठ शिक्षकांनी चाळीस हजार रोख जमा केले.पालक,पदाधिकारी, ग्रामस्थांनीही यावेळी स्वयंस्फूर्तीने जवळपास एक लाख तीस हजारांची देणगी जाहीर करत शाळेविषयी आपलेपणाची भावना दाखवली.
यावेळी ज्योतीराम मदने,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष हनुमंत नरसाळे इतर मान्यवर व शिक्षकांनी आपली मनोगते करताना शाळेच्या भौतिक सुविधा पूर्ण करण्यासाठी सर्वोतोपरी मदत करण्यात येईल जळोली शाळा तालुका,जिल्हा स्तरावर चमकतेय याचा आम्हांला अभिमान वाटतो, पुढील काळातही शिक्षणाबरोबरच संस्कारशील पिढी बनवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मनोगते व्यक्त केली.सर्व दानशूर दात्यांचा सत्कार शाळेच्यावतीने करण्यात आला.या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे शाळेच्या प्रगतीसाठी उर्जा निर्माण झाल्याची भावना शिक्षकांनी बोलून दाखवली.
जळोली शाळेचे मुख्याध्यापक अनिल जगताप यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार करण्यात आला.जळोली गावातील माता पालक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.शिक्षकांनी स्वयंस्फुर्तींने गणवेश केल्यामुळे शिक्षकांच्या एकीचं दर्शन घडले.कार्यक्रमाचे सुंदर सुत्रसंचलन जयवंत कापसे यांनी तर आभार शिक्षिका देवकी कलढोणे (दुधाणे) यांनी मानले.मेळावा यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक अनिल जगताप,शिक्षक जयवंत कापसे, नागनाथ गायकवाड,सिध्देश्वर लोंढे, कैलास नरसाळे,बाळासाहेब खांडेकर, ज्ञानेश्वर दुधाणे यांनी अधिक परिश्रम घेत मेळावा यशस्वी केला.

















