सांगोला – नगरपालिकेच्या निवडणुकीत मला एकाकी का पाडले यावर मी बोलत नाही. माझ्या जीवनात गेल्या ४० वर्षांपासून एकट्याने लढायची मला सवय होती. ही माझी पहिली लढाई या तालुक्यातील नाही. मी शून्य होणार नाही कारण सांगोलच्या जनतेने मला कधीच शून्य होऊ दिले नाही असे प्रतिपादन माजी आ.शहाजीबापू पाटील यांनी केले. ते शनिवार दि.२७ डिसेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवसेनेतर्फे आयोजित सांगोला शहरातील मतदारांचे आभार सभेत बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी नगराध्यक्ष रफिकभाई नदाफ, नूतन लोकनियुक्त नगराध्यक्ष आनंदा माने व १५ नगरसेवक यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
पुढे बोलताना शहाजीबापू पाटील म्हणाले, सांगोला तालुक्याची ओळख महाराष्ट्राच्या इतिहासात वेगळी आहे. येथे हुकूमशाही पद्धतीने राजकारण चालू देणार नाही. मी जर ही निवडणूक लावली नसती तर विरोधक घरात बसून मालक होत होती. हे निवडणूक सांगोला तालुक्यातील जनतेच्या स्वाभिमानाची होती. महायुतीशी मी प्रामाणिक आहे. महायुतीमध्ये सांगोला मतदारसंघ शिवसेनेचा आहे. शिवसेनेचा सन्मान राखण्याचा शब्द द्या, तुमचा कुठलाही शब्द खाली पडू देणार नाही. यावेळी शिवसेनेचे कार्यकर्ते, मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेचे सूत्रसंचालन आनंद घोंगडे यांनी केले.
धनुष्य बाणाला मतदान करणाऱ्याची जागा स्वर्गात
निवडून आलेल्या नगराध्यक्ष व १५ नगरसेवक यांचे अभिनंदन करतो. ज्यांनी ज्यांनी धनुष्य बाणाचे बटन दाबले त्यांना उद्या स्वर्गातच जागा आहे. नरकात तुम्हाला देव घेत नाही.
– माजी आ.शहाजीबापू पाटील
















