सोलापूर – महाराष्ट्राच्या इतिहासातील एक तेजस्वी पर्व पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर जिवंत होणार आहे. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या संघर्षमय, प्रेरणादायी आणि क्रांतिकारी जीवनावर आधारित ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ ही भव्य मालिका ५ जानेवारीपासून सायंकाळी ७.३० वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सुप्रसिद्ध अभिनेत्री मधुराणी गोखले क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या भूमिकेत दिसणार असून डॉ. अमोल कोल्हे महात्मा जोतीराव फुले यांच्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहेत.
गेली अनेक वर्षे स्टार प्रवाह वाहिनीने दर्जेदार आणि आशयघन कलाकृतींच्या माध्यमातून महाराष्ट्राचं मनोरंजन करताना समृद्ध इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे. राजा शिवछत्रपती, जय भवानी जय शिवाजी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या ऐतिहासिक मालिकांनंतर आता ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ ही महत्त्वपूर्ण मालिका स्टार प्रवाह प्रेक्षक भेटीस घेऊन येत आहे. साधारणतः दीडशे वर्षांपूर्वी, महिलांना चूल आणि मूल या मर्यादांमध्ये अडकवून ठेवणाऱ्या समाजव्यवस्थेविरोधात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा जोतीबा फुले यांनी ठामपणे एल्गार पुकारला. मुलींना शिक्षणाचा अधिकार मिळावा, स्त्रीला विचार करण्याचं आणि स्वतःचं अस्तित्व घडवण्याचं स्वातंत्र्य मिळावं यासाठी या क्रांतिकारी दाम्पत्याने अपार संघर्ष केला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत, घरच्यांचा आणि समाजाचा दुहेरी रोष सहन करत त्यांनी शिक्षणाची दारं खुली केली. काळाच्या पुढचा विचार करणाऱ्या या विचारवंतांचा जीवनप्रवास मालिकेच्या रुपात उलगडणार आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाने ही मालिका आवर्जून पाहायला हवी.
या महत्त्वाकांक्षी प्रोजेक्टविषयी सांगताना स्टार प्रवाहचे व्यवसाय प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले, ‘रसिकांच्या मनोरंजनासोबतच सामाजिक बांधिलकी जपण्याचे कार्य स्टार प्रवाह वाहिनी सातत्याने करत आली आहे. आजच्या जगात सर्वत्र स्त्री–पुरुष समानतेची वाटचाल सुरू आहे. देशातील महत्त्वाच्या पदांवर स्त्रिया सक्षमपणे काम करताना दिसतात. परंतु काही काळापूर्वी त्यांची मर्यादा केवळ घर आणि मुलांपर्यंतच होती. ज्या समाजात मुलगी आठ वर्षांची झाली की तिला “वयात आली” असे म्हणत तिचे हसणे–खेळणे रोखले जाई, जिथे शिक्षण ही फक्त काही विशिष्ट लोकांची मक्तेदारी होती—अशा समाजात धैर्याने घराबाहेर पडून शिक्षणाचा मूलभूत हक्क मिळवून देणाऱ्या महात्मा जोतीबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मोठी क्रांती घडवली. केवळ शिक्षणच नव्हे तर विधवा पुनर्विवाह, बालविवाह, सतीप्रथा अशा अनेक अमानुष रूढींना ठामपणे विरोध करून संतुलित समाज उभारण्याचा त्यांनी प्रयत्न केला. हा ऐतिहासिक प्रवास शक्य झाला तो सावित्रीबाई फुले यांच्या कष्टामुळे आणि महात्मा जोतीबा फुले यांच्या ठाम पाठिंब्यामुळे. सावित्रीबाई संसार सांभाळून समाजपरिवर्तनाची लढाई लढल्या. त्यांच्यामुळेच आज प्रत्येक स्त्री समाजात मानाने जगू शकते. अश्या महान क्रांतीज्योतीची कथा मांडणं क्रमप्राप्त होतं. माझी खात्री आहे की ही मालिका समस्त मालिका विश्वात मैलाचा दगड ठरेल.’
इतिहास जिवंत करणारी आणि विचारांना चालना देणारी ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ मालिका नक्की पाहा ५ जानेवारीपासून सायंकाळी ७.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर
























