सोलापूर : रोटरी क्लब ऑफ सोलापूर स्मार्ट सिटीच्या रोटरॅक्ट क्लबचा पहिला पदग्रहण सोहळा नागेश करजगी ऑर्किड अभियांत्रिकी महाविद्यालयात संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डिस्ट्रिक्ट गव्हर्नर इलेक्ट जयेश पटेल, अध्यक्ष डॉ. अकबरसाहेब नदाफ, सचिव प्रा. बसवराज बिराजदार, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. के. सोनगे, रोटरॅक्ट क्लबचे नूतन अध्यक्ष प्रणव गायकवाड, नूतन सचिव अक्षता मामडयाल हे उपस्थित होते.
रोटरीयन जयेश पटेल यांनी युवा रोट्रॅक्टर्सना समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आपले सर्वोत्तम योगदान देण्याची प्रेरणा दिली. त्यांनी पर्यावरणावर आधारित उपक्रम राबविण्याचे महत्त्व अधोरेखित करत पृथ्वी स्वच्छ, हरित व आरोग्यदायी बनविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. तसेच शासनाच्या उपक्रमांद्वारे व रोटरी संघटनेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या सामाजिक जनजागृती मोहिमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहनही त्यांनी रोट्रॅक्टर्सना केले.
प्रारंभी रोटरी क्बल ऑफ स्मार्ट सिटीच्या अध्यक्ष रोट. डॉ. अकबरसाहेब नदाफ यांनी रोटरी अंतर्गत येणाऱ्या सर्व कार्यक्रमाची सविस्तर माहिती दिली व नवीन रोटरॉक्ट क्लबला शुभेच्छा दिल्या.
प्रमुख पाहुण्यांचा परिचय स्मृध्दी गवळी यांनी करून दिला. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा परिचय श्रावणी बिराजदार व झेबा शेख यांनी करून दिला. त्यानंतर अध्यक्ष प्रणव गायकवाड, सचिव अक्षता मामडयाल, खजिनदार ज्योर्तिमय भद्रेश्वरमठ, उपाध्यक्ष संजय लाडे, स्मृध्दी गवळी, सहसचिव श्रावणी डोके, सहखजिनदार श्रावणी बिराजदार, पायल मोरे, वैष्णवी बागल, अनिरूध्द वडतीले, ऋषीकेश बिराजदार, सप्तगिरी पुंजाल, जमीर शेख, पार्थ स्वामी यांनी नूतन सदस्यपदाची शपथ घेतली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. के. सोनगेही रोटरॅक्ट क्लबच्या नवीन सदस्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी नूतन अध्यक्ष प्रणव गायकवाड यांनी चालू वर्षात लोकसहभागातून समाज परिवर्तन व युनाइट फॉर गुड उपक्रम राबवण्याचा संकल्प केला. कार्यक्रमास रोट. महेश साळुंके, रोट. नागेश शेंडगे, रोट. इक्बाल बागबान आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन झेबा शेख व श्रावणी बिराजदार यांनी केले तर सचिव अक्षता मामडयाल यांनी आभार मानले.


















