पंढरपूर – शहरातील भीमा नदीवर असलेल्या अहिल्यादेवी पुलावरून कंटेनर व ट्रकची धडक झाल्याने दोन्ही वाहने पुलावरून खाली कोसळली.ही घटना रविवारी (ता.११) रात्रीच्या सुमारास घडली. या भीषण अपघातात दोघे जण ठार झाले आहेत, तर नऊ जण जखमी झाले आहेत. राजू रमेश चव्हाण (वय ४५, करकंब), महादेव दिलीप काळे (वय २६, रा. बेंबळे) अशी मयतांची नावे आहेत.
दगडू देशमुख (करकंब) यांच्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये चालक अरविंद काळे हे अंदाजे १२ ऊसतोड कामगार घेऊन करकंब येथील विजय शुगर साखर कारखान्याकडे जात होते. त्यावेळी समोरुन येणाऱ्या कंटनेरची धडक ट्रँक्टरला बसली. त्या नंतर दोन्ही वाहने सुमारे २० ते २५ फूट अंतरावरुन खोल पूलावरुन खाली पात्रात कोसळली. या अपघाता नंतर कंटनेर हा ट्रँक्टर आणि ट्राँलीवर कोसळलेला होता. त्यामुळे अपघाता नंतर दोन्ही वाहने बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. दोन क्रेन आणि दोन पोकलेनच्या सहाय्याने दोन्ही वाहने बाहेर काढून जखमींना तातडीने आठ ते नऊ रुग्णवाहिका मधून येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.
अपघाताची माहिती येथील उपविभागीय पोलिस अधिकारी डाँ.प्रशांत डगळे, प्रांताधिकारी सचिन इथापे, तहसीलदार सचिन लंगोटे, सपोनी आशिष कांबळे हे अपघातस्थळी दाखल झाले. त्यांनी जातीने लक्ष घालून अपघातग्रस्तांना तातडीने बाहेर काढण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणांना सूचना दिल्या.
———————–
उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या जखमींची नावे
अपघातानंतर तत्काळ मदत पोहोचवण्यात आली. लक्ष्मी राजेंद्र चव्हाण (वय ३८), सुवर्णा ज्ञानेश्वर पवार (वय ४५), अनिता भारत काळे (वय १९), विनोद सुखदेव गोमटे (वय ३०), नाना हनुमंत काळे (वय ३२), देवांगी राजेंद्र चव्हाण (वय ८), गुड्डन राजेंद्र चव्हाण (वय ४, वरील सर्व रा. करकंब, ता. पंढरपूर), अरविंद काळे (ब्रिजेश कुमार (वय ३५) या जखमींना उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असल्याची माहिती तहसीलदार सचिन लंगुटे यांनी दिली.



















