बार्शी – स्वामी विवेकानंद यांचे व्यक्तित्व व कर्तृत्व हे सर्वश्रुत आहे. स्वामी विवेकानंदांच्या कर्मयोगाचा सिद्धांत मांडून कर्मयोग हा जीवनाचा गाभा आहे, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध वक्त्या व विचारवंत डॉ.कमलताई ठकार यांनी केले. स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त विवेकानंद केंद्र कन्याकुमारी, शाखा बार्शी व श्री भगवंत देवस्थान ट्रस्ट बार्शी यांच्यावतीने भगवंत मंदिरात ‘स्वामी विवेकानंद: कर्मयोगी संत’ या विषयावर त्या व्याख्यान देत होत्या.
पुढे बोलताना डॉ. ठकार म्हणाल्या, स्वामीजींची जीवनयात्रा महान संदेश असून त्यांची भूमिका समजून घेणे काळाची गरज आहे. युवा हे देशाचे आधारस्तंभ असून त्यांनी व्यक्तिगत विकासाबरोबरच समाजहिताचा विचार करणे आवश्यक आहे. युवकांना संबोधून त्या म्हणाल्या, जो अभिजात असतो त्याचा संघर्ष स्वतःशी असतो. हा संघर्ष करताना, सत्याला अभिनिवेश नसतो हे उद्गार त्यांनी काढले. त्याचप्रमाणे हृदय अद्वैताचे अधिष्ठान आहे. ज्ञानसंपन्नतेचा विचार मांडताना त्या म्हणाल्या, जिथे ज्ञानाचे दर्शन घडते तिथे प्रदर्शन नसते. नैतिकता हा दागिना असून नैतिक मूल्यांचा स्पर्श जेव्हा जीवनाला होतो ते जीवन आदर्श असते.जीवनात आचार विचारांची साम्यता असते ते जीवन वंदनीय असते.समाजातील अपप्रवृत्तीचा विचार करताना त्यांनी स्पष्ट केले की, कधी कधी मोठयांचा सत्कार होतो पण माणुसकीचा होत नाही. जेथे माणूस जोडला जातो तेथे देश जोडला जातो. त्याचप्रमाणे त्यांनी संयमावर बोलताना स्पष्ट केले की, जेंव्हा संयमाचे बंधन असते तेंव्हा स्वातंत्र्याचा स्वर उमटतो. विवेकानंदाच्या जीवनातील गोष्टींना उजाळा देत मनाची ताकद जग जिंकण्याचे बळ देते, असे त्या म्हणाल्या.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. बी. वाय. यादव यांनी स्वामी विवेकानंद यांच्या चरित्रातून युवकांनी बोध घेवून कार्यप्रवण व्हावे, असे सांगितले. त्याचप्रमाणे त्यांनी युवकांच्या क्षमता व कलागुणांना वाव देण्यासाठी अशा कार्यक्रमांची गरज स्पष्ट केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.ज्योती डोळस यांनी केले, प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा. डॉ.अबोली सुलाखे यांनी करुन दिला. प्रार्थना वंदना कुलकर्णी तर विवेकानंद गीत ॲड. प्रशांत शेटे यांनी प्रस्तुत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. किर्ती डोळस तर आभार विनोद कबाडे यांनी केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी अमृता रंगदाळ, कोमल कबाडे, मुकुंदशेठ कुलकर्णी, सुरेशभाऊ हालमे, प्रा.डॉ.राहुल पालके, अमोल सुलाखे, मुकुंदराज कुलकर्णी, ॲड.बिरप्पा तुपे, सुधीर माईनकर, वसेकर, केदार बेताळे, संजय निरंजन, यल्लाप्पा कट्टीमनी, विवेक धर्मराव, महेश महामुनी, सुनीत दहिवाले, विजय घुमरे, यशराज कबाडे, विलास शिंदे आदींनी सहकार्य केले.


















