वैराग : राष्ट्रीय सेवा योजनामध्ये कार्यरत स्वयंसेवक हे उद्याचे सक्षम आणि सुजाण नागरिक असून ते देशाचे भवितव्य आहेत , राष्ट्रीय सेवा योजनेतून जे कार्य केले जाते त्यातून देशाची जडणघडण होते. देशाच्या जडणघडणीत राष्ट्रीय सेवा योजनेचे योगदान मोलाचे आहे, असे प्रतिपादन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे मानव विद्या शाखेचे प्रभारी अधिष्ठाता प्र. प्राचार्य डॉ. इ. जा. तांबोळी यांनी केले. ते सौ. सुवर्णलता गांधी महाविद्यालय व सौ . शोभाताई सोपल कनिष्ठ महाविद्यालय, वैराग यांच्या संयुक्त विद्यमाने मालेगाव (आर ) येथे आयोजित विशेष श्रम संस्कार शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शकील शेख हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून कै. शं. बा. पाटील महाविद्यालय अनगर येथील प्रा.पांडुरंग शिंदे हे उपस्थित होते. याप्रसंगी प्रा. पांडुरंग शिंदे आपले विचार मांडताना म्हणाले की, राष्ट्रीय सेवा योजनेतून नैतिक मूल्य रुजवण्याचे, नेतृत्व गुण विकसित करण्याचे कार्य घडते.
अध्यक्ष स्थानावरून बोलताना डॉ. शकील शेख म्हणाले की, राष्ट्रीय सेवा योजनेतून फक्त स्वयंसेवकांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होत नाही तर त्यांच्या कार्यातून समाज जागृती, पर्यावरण संरक्षण, महिला सक्षमीकरण, ग्राम सुधारणा अशा प्रकारच्या विविध गोष्टी घडण्यास मदत मिळते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. बिरूनके ए. आर. यांनी, सूत्रसंचालन डॉ . पुकाळे व्हि. के. यांनी तर आभार प्रा. जाधवर एस. ए. यांनी मानले.
याप्रसंगी मालेगाव (आर )चे उपसरपंच निवृत्ती घोडके, जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजपाल भुसारे, जिल्हा परिषद शाळा मालेगाव (आर ) चे मुख्याध्यापक संभाजी महादेव ठोंगे, स्वयंसेवक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटोओळी : राष्ट्रीय सेवा योजनेच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना डॉ. इ .जा तांबोळी व्यासपीठावर प्रा. पांडुरंग शिंदे, डॉ. शकील शेख , निवृत्ती घोडके, संभाजी ठोंगे इ. उपस्थित होते.


















