पंढरपूर – देशाचे माजी पंतप्रधान एच.डी.दैवेगौडा यांचा गुरुवारी पंढरपूर दौरा होता. विठ्ठलाचे दर्शन तसेच चंद्रभागा नदीची पूजा त्यांच्या हस्ते करण्यात आल्यामुळे येथील चंद्रभागा नदीची सकाळ पासूनच पालिकेच्या वतीने स्वच्छता करण्यात आली होती. त्यामुळे नियमित प्रदक्षिणा करणाऱ्या मंडळींना चंद्रभागेचे स्वच्छ वाळवंट पाहून आश्चर्याचा सुखद धक्का बसल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.
देशाचे माजी पंतप्रधान एच.डी.देवेगौडा यांनी पंढरपूरात येवून आज विठुरायाचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने मंदिरसमितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज ओसेकर यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी माजी पंतप्रधान देवेगौडा यांच्या समवेत त्यांचे कुटुंबिय देखील उपस्थित होते.
दरम्यान देवेगौडा यांच्या पंढरपूर भेटीत चंद्रभागेच्या वाळवंटाला देखील ते भेट देणार होते. त्यामुळे पालिकेच्या वतीने गुरुवारी सकाळ पासूनच चंद्रभागेच्या स्वच्छतेचे काम हाती घेण्यात आलेले होते. वाळवंटाची स्वच्छता तसेच नदीपात्रातील कपडे,निर्माल्य, आदींची देखील स्वच्छता करण्यात आली. या बरोबरच पात्राच्या तिरावरील शेवाळे, गाळ सदृश्य माती देखील काढण्यात आली.
वाळवंट स्वच्छतेसाठी सफाई कर्मचाऱ्यांबरोबरच साठलेला कचरा उचलण्यासाठी दोन जेसीबी,पोकलँन तसेच टिपरची देखील खास व्यवस्था करण्यात आलेली होती. सकाळ पासुन दुपार पर्यंत हे काम सलग सुरु असल्याचे दिसत होते. सुमारे आठ ते दहा टिपर कचरा उचलण्यात आल्याची माहिती स्वच्छतेच्या कामावरील अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.
—————————
मंदिर परिसर देखील स्वच्छ आणि दिसत होता मोकळा
ऐरव्ही येथील विठ्ठल मंदिर परिसरात फेरीवाले, रस्त्याच्या कडेला बसुन विक्री करणारी मंडळी, हातगाड्यावरुन विक्री करणारे लोक यांची मांदियाळी असते. त्यामुळे मंदिर परिसरातील कायमस्वरुपी दुकानदारांना याचा त्रास सहन करावा लागत असतो. पालिका, पोलिस यांचे व्हीआयपी, व्हीव्हीआयपी मंडळीं येणार असतील तरच मंदिर परिसरातील अशा फेरीवाले, विक्रेते लोकांवर कारवाईचा बडगा उगारला जातो. गुरुवारी देखील माजी पंतप्रधान देवेगौडा येणार म्हणून मंदिर परिसर मोकळा करण्यात आलेला होता. ऐरव्ही गर्दी तसेच अशा फेरीवाले मंडळींच्या अतिक्रमणामुळे मंदिर परिसरातून चालणे देखील शक्य होत नाही. मात्र आज मंदिर परिसर अगदी मोकळा वाटत होता. शहरात देखील जागोजागी तसेच चंद्रभागेच्या वाळवंटातसुध्दा माजी पंतप्रधानाच्या दौऱ्यामुळे पोलिसाचा फौजफाटा दिसत होता.
——————–
फोटोओळी : पंढरपूर : देशाचे माजी पंतप्रधान एच.डी.देवेगौडा गुरुवारी पंढरपूर दौऱ्यावर असल्यामुळे विठ्ठल मंदिर परिसरात फेरीवाल्यांना आज मज्जाव करण्यात आलेला होता. त्यामुळे मंदिर परिसर मोकळा श्वास घेताना दिसत होता. या बरोबरच चंद्रभागा नदीच्या दर्शनासाठी देखील माजी पंतप्रधान जाणार असल्यामुळे सकाळ पासूनच चंद्रभागा वाळवंट तसेच पात्रांच्या पैलतिरावर स्वच्छता मोहिम राबविली जात होती. (छायाचित्रे : उमेश टोमके, पंढरपूर )
——————–
फोटोओळी : देशाचे माजी पंतप्रधान एच.डी.देवेगौडा यांनी आपल्या कुटुंबातील सदस्यां समवेत गुरुवारी पंढरपूरातील विठ्ठल मंदिराला भेट देवून विठ्ठल रुक्मिणीमातेचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज ओसेकर, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, मंदिर समितीचे सदस्य आदी उपस्थित होते.

























