पंढरपूर – येथील पंढरपूर एज्युकेशन सोसायटीच्या द. ह.कवठेकर प्रशालेचे माजी विद्यार्थी पवन मंगरूळे यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत नुकतीच डेप्युटी कलेक्टर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे त्यांनी नुकतीच आपल्या द.ह.कवठेकर प्रशालेस खास सदिच्छा भेट दिली.
द.ह.कवठेकर प्रशालेतून पवन मंगरुळे यांनी इयत्ता दहावीची परीक्षा सन २०१३ मध्ये उत्तीर्ण केली व त्यानंतर त्यांनी अकलूज येथून बीएससी ऍग्री केले. पुढे राहुरी येथे त्यांनी एम.एस.सी.ऍग्री करीत असताना एमपीएससी परीक्षेचा अभ्यास केला.
प्रथम त्यांची बालसंगोपन विभागाकडे वर्ग दोन अधिकारी म्हणून नियुक्ती झाली व तदनंतरच्या परीक्षेत त्यांची डेप्युटी कलेक्टर प्रथम वर्ग अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचे पाचवी ते दहावीचे शिक्षण याच प्रशालेत झाले. यावेळी त्यांनी शाळेतील आपल्या आठवणींना उजाळा दिला व आपल्या सर्व विषय शिक्षकांच्या भेटी घेतल्या. शाळेने त्यावेळी केलेल्या संस्काराबाबत व राबविलेल्या विविध उपक्रमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी दहावीच्या विद्यार्थ्यांना त्यांनी एमपीएससी स्पर्धा परीक्षा याबाबत मार्गदर्शन केले व मुलांचा आत्मविश्वास जागृत केला. त्यांनी परीक्षेतील हे यश स्वयंअध्ययनावर प्राप्त केले. घरची परिस्थिती अत्यंत प्रतिकूल असताना देखील त्यावर मात करून त्यांनी हे यश प्राप्त केले त्याबद्दल प्रशालेचे मुख्याध्यापक व्ही.एम.कुलकर्णी यांनी डेप्युटी कलेक्टर पवन मंगरुळे यांचा सत्कार केला. यावेळी संस्थेचे पदाधिकारी एस.पी. कुलकर्णी यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमास सेवानिवृत्त उप मुख्याध्यापक एम.आर. मुंढे, पर्यवेक्षक आर. एस. कुलकर्णी, ज्येष्ठ शिक्षक प्रशांत मोरे, समीर दिवाण आदींसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


















