सोलापूर – रंगगंध कलासक्त न्यास, चाळीसगाव व भास्करानंदी चित्र सोलापूर आयोजित खुली जागतिक मराठी साहित्य अभिवाचन स्पर्धा आज लिटिल वंडर्स स्कूल विजापूर रोड सोलापूर येथे उत्साहात पार पडली. एकूण दहा संघानी आपला उस्फूर्त सहभाग नोंदविला.
स्पर्धेचे उद्घाटन ज्येष्ठ रंगकर्मी राजेश जाधव यांच्या हस्ते झाले तर कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी भास्करानंदी चित्र संस्थेचे अध्यक्ष भास्कर जाधव हे होते. सुरुवातीला दीप प्रज्वलन आणि कै. आनंदी जाधव यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून स्पर्धेला सुरुवात झाली.
प्रतीथयश लेखकांच्या कवितावर आधारित कथा निबंध व ललित लेख नाट्यमयरित्या सादर करून सर्वच संघांनी उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली. सर्वच संघांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले . याप्रसंगी वनिताताई म्हैसकर, सुहास मार्डीकर, अमोल राजमाने, संदीप उडाणशिव, शिरीष देखणे, विजय साळुंखे उपस्थित होते.
• स्पर्धेचा अंतिम निकाल पुढीलप्रमाणे
शब्दगंध सोलापूर सांघिक प्रथम
आराधना विश्वस्त मंडळ सांघिक द्वितीय
• वैयक्तिक वाचिक अभिनय पारितोषिके- सुशांत निकंबे विशेष उल्लेखनीय अभिनय प्रमाणपत्र तर तेजश्री कुमठेकर, अनुश्री जुजगार, सुमित्रा देशमुख, विजय दहिवाळ यांना अभिनय प्रमाणपत्रे मिळाली.
शब्दगंध सोलापूर व आराधना विश्वस्त मंडळ या दोन्ही संघाची चाळीसगाव येथे होणाऱ्या अंतिम फेरीच्या स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.
पारितोषिक वितरण लिटल वंडर संस्थेच्या अध्यक्ष सौ. संगीता माने, भास्करानंदी चित्र संस्थेचे भास्कर जाधव तसेच स्पर्धेचे परीक्षक जयप्रकाश कुलकर्णी, प्रा. गणेश शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
स्पर्धेचे परीक्षक म्हणून ज्येष्ठ नाट्य लेखक जयप्रकाश कुलकर्णी व बाह्य परीक्षक म्हणून संभाजीनगर विद्यापीठातील नाट्य विभागाचे प्रा. गणेश शिंदे यांनी काम पाहिले.
स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी राधिका जाधव, आनंद भालेराव, साहिल जाधव, सुयोग न्यामगोंडे, सुशांत कुलकर्णी, संदीप उडानशिव यांचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन संस्थेचे सचिव संदीप जाधव यांनी केले.

























