मुंबई – राज्यातील उच्च शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात दि. २६ नोव्हेंबर रोजी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्यासोबत कृती समिती व महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक मुंबईत पार पडली.
या बैठकीत १०-२०-३० आश्वासित प्रगती योजना लागू करणे, राज्यातील महाविद्यालये व विद्यापीठांमधील रिक्त पदांची तात्काळ भरती करणे, कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय ६० वर्षे करणे, शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे ५ दिवसांचा आठवडा लागू करणे व इतर प्रलंबित प्रश्नांवर सकारात्मक चर्चा झाली असून. आगामी नागपूर हिवाळी अधिवेशनादरम्यान मा. मुख्यमंत्री महोदयांसोबत विशेष बैठक आयोजित करून या मागण्यांवर अंतिम निर्णय घेतला जाईल, असे ठोस आश्वासन मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले.
या बैठकीस शासनाच्या वतीने उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी, उपसचिव अशोक मांडे, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, सहसंचालक श्रीमती बोऱ्हाडे यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
कर्मचारी संघटनांच्या वतीने कृती समितीचे अध्यक्ष अजय देशमुख, महासंघाचे सरचिटणीस माधव राऊळ, कार्याध्यक्ष चंद्रकांत धनवडे, विद्यापीठ महासंघाच्या वतीने मिलिंद भोसले (अध्यक्ष, छत्रपती शिवाजी विद्यापीठ), रावसाहेब त्रिभुवन व इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी गुरुवारी (दि. 26) पुकारण्यात आलेल्या कामबंद आंदोलनास राज्यभरातील कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आंदोलनास दिलेल्या या अभूतपूर्व सहकार्याबद्दल संयुक्त कृती समितीच्या वतीने वतीने सर्व कर्मचाऱ्यांचे आभार मानण्यात आले आहेत.





















