सोलापूर : प्रेमप्रकरणातून तरुणाने लॉजमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सोलापूर शहरातील भाग्यलक्ष्मी लॉजमध्ये एका तरुणाने गळफास घेऊन आपले जीवन संपवले. मृत तरुणाचे नाव हरीश भास्कर बंडी वय २९, राहणार नीलम नगर, सोलापूर असे आहे.
ही घटना दिनांक ७ फेब्रुवारी २०२० रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते छत्रपती संभाजी महाराज चौक रस्त्यावरील आंबेसेटर हॉटेलजवळील भाग्यलक्ष्मी लॉज, दुसऱ्या मजल्यावरील रूम क्रमांक १२० येथे सकाळी अकरा वाजेच्या सुमारास उघडकीस आली.
नातेवाइकांच्या माहितीनुसार, हरीश बंडी यांचे एका मुलीशी प्रेमसंबंध होते. त्यानंतर घरच्यांनी मुलीच्या घरच्यांकडे लग्नाची मागणी केली होती, परंतु मुलीच्या आई-वडिलांनी नकार दिला. यामुळे हरीश तणावाखाली आला होता. दिनांक ४ फेब्रुवारी २०२० रोजी सायंकाळी तो घरातून बाहेर पडला होता. त्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्यात बेपत्ता तक्रार दाखल करण्यात आली होती.
शनिवारी सकाळी लॉजमधील रूममध्ये त्याचा मृतदेह सापडल्याने नातेवाइक आणि परिसरात एकच खळबळ उडाली. मृतदेह शवविच्छेदनासाठी सोलापूर शासकीय रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पिटल) पाठवण्यात आला आहे. घटनेच्या माहितीवरून नातेवाइक आणि मित्रांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली. नातेवाइकांनी या प्रकरणाची चौकशी व्हावी व दोषींवर कारवाई व्हावी, अशी मागणी केली आहे.


















