सोलापूर : स्मार्ट सिटी योजनेतून सुमारे चार कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या रंगभवन प्लाझाची महानगरपालिकेच्या देखभाल दुरुस्तीच्या अभावामुळे व दुर्लक्षामुळे सध्या भयानक दुरवस्था झाल्याचा मुद्दा उपस्थित करत संभाजी ब्रिगेडच्या वतीने व भारतीय जैन संघटनेच्या वतीने रंगभवन चौकातील ‘रंगभवन प्लाझा बचाव आंदोलन’ करण्यात आले.
सुरुवातीला सेल्फी पॉइंट, सौरऊर्जा, आकर्षक एलईडी दिवे, एलईडी स्क्रीन आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून या प्लाझाचा मोठा गाजावाजा करण्यात आला होता. मात्र आज अनेक एलईडी दिवे बंद अवस्थेत असून स्क्रीन आणि सुरक्षा यंत्रणेच्या सीसीटीव्हीच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. परिसरात वाळलेले गवत वाढलेली झाडी, अस्वच्छता आणि जनावरांचा वावर यामुळे या ठिकाणच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
जैन धर्मीयांच्या स्मारकाच्या परिसराकडेही पुरेसे लक्ष दिले जात नसल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आला आहे.
जनतेच्या कररूपी पैशातून उभारण्यात आलेल्या या प्रकल्पाची अशी अवस्था का झाली? देखभालीची जबाबदारी कोणाची? चार कोटींच्या खर्चाचा नेमका हिशेब काय? असे प्रश्न उपस्थित करत संभाजी ब्रिगेड महानगरपालिका प्रशासनाकडे आर्थिक व तांत्रिक चौकशी, सर्व सुविधा पूर्ववत सुरू करणे आणि कायमस्वरूपी देखभाल व्यवस्था निर्माण करण्याची मागणी सोलापूर महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे करण्यात आली आहे
यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शाम कदम, जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष मीनल दास, वैभव गायकवाड, केतन शहा आदी उपस्थित होते.






















