धाराशिव – तब्बल चार वर्षांनंतर धाराशिव नगरपालिकेची सर्वसाधारण सभा पार पडली. २०२१ पासून निवडणुका न झाल्याने नगराध्यक्ष पद रिक्त होते. मात्र नव्याने निवड झाल्यानंतर नगराध्यक्ष नेहाताई काकडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत विविध विषयांना बहुमताने मंजुरी देण्यात आली.
यामध्ये कचरा डेपो हटवणे, मालमत्ता कर सवलत आणि अभय योजना हे प्रमुख निर्णय ठरले. शहरात कचरा डेपोमुळे दुर्गंधी, धूर व आरोग्यविषयक तक्रारी वाढत असल्याची बाब सभेत मांडण्यात आली. त्यावर सध्याच्या डेपोतील साचलेल्या कचऱ्यावर वैज्ञानिक पद्धतीने प्रक्रिया करून तो पुढील सहा महिन्यांत शहराबाहेर हलवण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. भविष्यातील कचरा व्यवस्थापनासाठी स्वतंत्र आराखडा तयार करण्याचाही निर्णय घेण्यात आला.
नागरिकांना आर्थिक दिलासा देण्यासाठी थकीत मालमत्ता करावरील दंड माफ करण्यासाठी अभय योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच माजी सैनिक, त्यांच्या विधवा तसेच स्वातंत्र्यसैनिक व त्यांच्या कुटुंबीयांना मालमत्ता करात सवलत देण्यास मान्यता देण्यात आली. नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेसाठी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे मार्गदर्शन लाभत असल्याचा उल्लेख करत राज्य शासनाच्या विविध योजनांमधून आवश्यक निधी उपलब्ध करून घेण्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचेही सांगण्यात आले.
दरम्यान, शहरातील जुन्या पथदिव्यांची दुरुस्ती करून एलईडी दिवे बसवणे, पोलीस लाईन परिसरात उद्यान उभारणे, नमो उद्यान प्रकल्पाला गती देणे, स्वच्छता निविदा प्रक्रिया, घंटागाड्यांची दुरुस्ती, भटक्या कुत्र्यांचे नियोजन व अनधिकृत बॅनरवर कारवाई आदी विषयांनाही मंजुरी देण्यात आली. चार वर्षांच्या खंडानंतर झालेल्या या सभेत कचरा डेपो, कर सवलत आणि अभय योजना या निर्णयांना विशेष महत्त्व प्राप्त झाले.























