जालना – जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जालना आणि महर्षी कणाद शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अंबड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा’ शुक्रवार दि. 13 फेब्रुवारी 2026 उत्साहात संपन्न झाला. या मेळाव्यामध्ये विविध नामांकित कंपन्यांनी 195 उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या त्यापैकी 44 पात्र उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटन महर्षी कणाद शासकीय आयटीआयचे प्राचार्य अतुल केसकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून जिल्हा कौशल्य विकास केंद्राचे सहाय्यक आयुक्त गणेश चिमणकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कौशल्य विकास मार्गदर्शन अधिकारी भुजंग रिठे यांनी केले.
गणेश चिमणकर म्हणाले की, शिक्षणाचे मुख्य ध्येय रोजगार किंवा स्वयंरोजगार मिळवणे हेच असायला हवे. शासनाने उपलब्ध करून दिलेल्या या प्लॅटफॉर्मचा तरुणांनी लाभ घ्यावा. तसेच, निवडीनंतर शासनाच्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत शैक्षणिक पात्रतेनुसार 6 ते 10 हजार रुपयांपर्यंत विद्यावेतनही दिले जाते, त्याचाही युवकांनी लाभ घ्यावा.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अमोल परिहार यांनी केले, तर कैलास काळे यांनी आभार मानले. मेळावा यशस्वी करण्यासाठी कौशल्य व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी अमोल बोरकर, नितीन लोकडे, योगेश बहूरे, विशाल जगरवाल, गणेश सुपारकर यांच्यासह कौशल्य विकास विभाग व आयटीआय अंबड येथील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.






















