सोलापूर : इंदिरा गांधी पार्क स्टेडियमवर बीसीसीआयच्या 23 वर्षाखालील मुलांच्या कर्नल सी के नायुडू क्रिकेट स्पर्धेतील तिसरा उपांत्यपूर्व सामना महाराष्ट्र व झारखंड संघात सुरू झाला असून पहिल्या दिवशी महाराष्ट्राने पहिल्या डावात 7 बाद 406 धावा केल्या असून कर्णधार सचिन धस 199 धावा करून खेळपट्टी वरती टिकून आहे. पहिला बळी दुसऱ्या षटकात मिळविल्यानंतर झारखंडची गोलंदाजी पिष्प्रभ करत दुसऱ्या गड्यासाठी 195 धावांची भागीदारी सचिन धस व नीरज जोशी यांनी केली.
स्पर्धेच्या नियमानुसार पाहुण्या संघाला कौल दिला जातो, त्याप्रमाणे झारखंड संघाने सकाळी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, आणि पहिल्याच चेंडूवर चौकार लगावत महाराष्ट्राचा यष्टिरक्षक साहिल औताडे याने सुरेख सुरुवात केली खरी, पण दुसऱ्याच षटकात शुभ शर्मा ने यष्टिरक्षक प्रभातकुमार माहतो कडे झेल देण्यास भाग पाडून सलामीची जोडी फोडली. त्यानंतर कर्णधार सचिन धस आणि नीरज जोशी यांनी संयमी खेळी करत दुसऱ्या गड्यासाठी 75 मिनिटात, 15 षटकात 50 धावांची भागीदारी करत धावफलक हलता ठेवला.
हीच भागीदारी दोघांनी एकेरी, दुहेरी तसेच प्रसंगी चौकार मारत 100 पार नेली. दरम्यान नीरज ने 68 चेंडूत 9 चौकारांनिशी वैयक्तिक अर्धशतक लगावले आणि पाठोपाठ सचिन धस ने देखील दमदार खेळी करत 50 धावा पूर्ण केल्या. जेवणाला खेळ थांबला तेव्हा 33 षटकात 129 धावा फलकावर लागल्या होत्या.
जेवणानंतर पुन्हा संयमी फलंदाजी करत दोन्ही फलंदाज नव्वदित पोचले, आणि शतकाला केवळ 3 धावा हव्या असताना नीरज जोशीला कौनैन कुरेशी ने कर्णधार राजन दीप कडे झेल देण्यास भाग पाडले व दुसऱ्या गड्याची 195 धावांची भागीदारी संपुष्टात आणली.
त्यानंतर आलेल्या, स्पर्धेत महाराष्ट्र कडून सर्वाधिक शतक, धावा करणारा दिग्विजय सोबत 63 धावांची भागीदारी करताना सचिन ने शानदार असे शतक झळकावले ते 13 चौकार, 2 षटकार लगावत. संघाच्या 264 धावा झाल्या असताना दिग्विजय पाटील (29) हा अमित कुमारच्या गोलंदाजीवर राजन दीप कडे झेल देऊन बाद झाला. सोलापूरचा स्थानिक खेळाडू अर्शिन कुलकर्णी त्यानंतर फलंदाजी साठी आल्यावर सामना पहायला आलेल्या लहान खेळाडू, चाहत्यांनी एकच जल्लोष केला पण केवळ 8 धावा करून 19 वर्षाखालील भारतीय संघाकडून, तसेच दुलीप ट्रॉफी खेळलेल्या फिरकी गोलंदाज मनीषी याला एक उंच फटका मारण्याच्या नादात अर्शिन सीमारेषेजवळ नकुल यादव कडे झेल देऊन परतला.
त्याच्या पुढच्याच षटकात हर्ष मोगावीरा देखील लगेच शून्यावर अमित कुमार कडून पायचीत झाला आणि पंचांनी चहापानाला खेळ थांबविला तेव्हा 5 बाद 286 (62.5) धावसंख्या झालेली.
चहापान नंतर आलेला विकी ओस्तवाल सोबत सचिन ने 28 धावांची भागीदारी करत स्वतःचे दीडशतक देखील पूर्ण केले. अमित कुमारने पुन्हा एक पायचितचा बळी मिळवत विकी ओस्तवाल (13) ला माघारी धाडले.
विकी नंतर किरण चोरमले हा फलंदाजीला आला आणि ताबडतोब अशी फलंदाजी करायला सुरुवात केली आणि 2 चौकार, 3 उत्तुंग षटकार लगावले. 26 चेंडूत 31 धावा केल्यावर अमित कुमारला फटका मारण्याच्या नादात किरण कौनैन कुरेशी कडे झेल देऊन तंबूत परतला.
दुसऱ्या बाजूने कर्णधार सचिन ने एक बाजू लावून धरत 20 चौकार लगावले, सोबत 4 षटकार देखील मारत 190 पार पोचला आणि संघाची धावसंख्या 350 पार नेली.
372 धावावर किरण चोरमले बाद झाल्यावर आलेल्या अजय बोरुडे सोबत संयमी फलंदाजी करत सचिन ने धावसंख्या 400 चे वर नेली.
पहिल्या दिवशीचा खेळ संपायला 2 षटके शिल्लक असताना सचिन 192 धावा वर नाबाद होता, त्यानंतर टोन चौकार लगावला, पुढच्या चेंडूवर दुहेरी धाव घेतली. शेवटच्या षटक मधील दुसऱ्या चेंडूवर 1 धाव घेतल्यावर तो 199 धावांवरती पोहोचला आणि द्विशतक करणेसाठी त्याला एका धावेची गरज असताना त्याचा साथीदार अजय बोरुडे याने शेवटचे चार चेंडू निर्धाव खेळून काढले व पंचांनी दिवसाचा खेळ थांबविला असून उद्या दुसऱ्या दिवसाचा पहिला चेंडू सचिन खेळणार असून त्यावर तो 200 पूर्ण करतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
झारखंड कडून अमित कुमार याने 82 धावा देत 4 तर शुभ शर्मा, मनीषि व कौनैन कुरेशी यांनी प्रत्येकी 1 बळी मिळवला आहे.























