सांगोला – इतिहासाने ओळख घ्यावी असे कार्य आपल्या हातून घडले पाहिजे. विद्यार्थ्यांनी लोक काय म्हणतील याकडे न पाहता आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करावे असा संदेश ॲड.गजानन भाकरे यांनी दिला. ते सांगोल्यातील शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये संस्थेचे अध्यक्ष बाबुराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती उत्सव कार्यक्रमात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष महादेव गायकवाड तसेच सचिव अंकुशराव गायकवाड, प्राचार्य
डॉ.रणजित देशमुख उपस्थित होते. पुढे बोलताना त्यांनी हिंदवी स्वराज्य या संकल्पनेचा उल्लेख करताना महाराजांचे शेतकऱ्यांवरील प्रेम, दूरदृष्टीपूर्ण निर्णय आणि मावळ्यांच्या कौशल्याची अचूक पारख यावर भाष्य केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला कॉलेजच्या प्रांगणात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्यासमोर ढोल-ताशांच्या गजरात शिवगर्जनांचा जयघोष करण्यात आला. प्रास्ताविकात डॉ.रणजित देशमुख यांनी महाराजांचे विचार व तत्त्वे यांवर मार्गदर्शन केले.
मृदुला पाटील, सुरेखा लिगाडे व तनुजा मोरे या विद्यार्थिनींनी महाराजांच्या जीवनकार्यावर प्रभावी भाषणे सादर केली. महादेव गायकवाड यांनी विद्यार्थ्यांनी महाराजांच्या धैर्य, प्रामाणिकपणा आणि कर्तव्यनिष्ठा या गुणांचा आदर्श ठेवून जीवनात मोठी उद्दिष्टे साध्य करावीत असे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.संदीप बावचे यांनी केले. या कार्यक्रमास सर्व विभागप्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.























