बार्शी – शहरात रविवार दि. ८ मार्च रोजी रंगपंचमीचा सण मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. नागरिकांनी नैसर्गिक कोरड्या रंगांची मुक्तपणे उधळण करत रंगपंचमीचा आनंद लुटला. लहान मुले, तरुण, महिला तसेच ज्येष्ठ नागरिकांनीही या सणात उत्स्फूर्त सहभाग घेत शहरातील वातावरण रंगमय केले होते.
रंगपंचमीच्यानिमित्ताने शहरातील विविध भागांमध्ये तसेच गल्लोगल्ली आणि चौकाचौकांत नागरिकांनी एकमेकांना रंग लावत सणाचा आनंद साजरा केला. सकाळपासूनच नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. अनेक ठिकाणी मित्रपरिवार, कुटुंबीय आणि तरुण मंडळींनी एकत्र येत कोरड्या रंगांची उधळण करत आनंदोत्सव साजरा केला. विशेष म्हणजे, यावर्षी अनेकांनी पर्यावरणपूरक नैसर्गिक रंगांचा वापर करुन देणे रंगपंचमी साजरी केल्याचेही दिसून आले.
श्री भगवंत व लक्ष्मी मूर्तींवर रंगांची उधळण
दरम्यान, बार्शीतील ऐतिहासिक आणि प्रसिद्ध श्री भगवंत मंदिरात रंगपंचमी निमित्त विशेष सजावट करण्यात आली होती. मंदिरात श्री भगवंत व लक्ष्मी यांच्या मूर्तींना आकर्षक वस्त्रे परिधान करून परंपरेनुसार रंगांची उधळण करण्यात आली होती. मूर्तींवर केलेली रंगांची उधळण आणि सजावट भाविकांचे विशेष लक्ष वेधून घेत होती. मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी झाली होती आणि अनेकांनी दर्शन घेऊन रंगपंचमीचा आनंद व्यक्त केला.
शहरात विविध भागांमध्ये नागरिकांनी शांततेत व आनंदाच्या वातावरणात रंगपंचमी खेळताना पाहायला मिळाले. परस्परांना रंग लावत स्नेहभाव वाढविण्याचा संदेश या सणातून देण्यात आला. रंगपंचमीच्या या उत्सवामुळे बार्शी शहरात सर्वत्र आनंद आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.




















