सोलापूर – दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या शेतकरी कुटुंबांतील विद्यार्थ्यांना शासनाच्या परीक्षा शुल्क माफीच्या निर्णयामुळे आर्थिक दिलासा मिळणार आहे. राज्यातील दुष्काळग्रस्त भागांतील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयाचे सोलापूरच्या प्रयास मागासवर्गीय संस्थेने स्वागत केले आहे.
दुष्काळामुळे शेतकरी कुटुंबांच्या उत्पन्नावर मोठा परिणाम झाला असून, त्याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होत आहे. परीक्षा शुल्क भरणेही अनेक कुटुंबांसाठी आर्थिक अडचणीचे ठरत असल्याने शासनाचा निर्णय विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा ठरणार असल्याचे संस्थेने म्हटले आहे.
दरम्यान, दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांची संपूर्ण शैक्षणिक फी माफ करावी, अशी मागणी प्रयास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सचिन शिंदे यांनी यापूर्वी मुख्यमंत्री तसेच उच्च व तंत्रशिक्षण, शालेय शिक्षण आणि कृषी मंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली होती.
परीक्षा शुल्क माफीचा निर्णय हा या मागणीच्या दिशेने सकारात्मक पाऊल असल्याचे संस्थेने नमूद केले. मात्र, केवळ परीक्षा शुल्क माफ करून विद्यार्थ्यांच्या आर्थिक अडचणी पूर्णपणे दूर होणार नाहीत. त्यामुळे शाळा, महाविद्यालये, तंत्रशिक्षण संस्था तसेच विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांची संपूर्ण शैक्षणिक फी माफ करण्याचा निर्णयही शासनाने घ्यावा, अशी अपेक्षा संस्थेने व्यक्त केली आहे.
दुष्काळग्रस्त कुटुंबांतील विद्यार्थ्यांचे शिक्षण आर्थिक अडचणींमुळे थांबू नये, यासाठी शुल्कमाफीची व्याप्ती वाढविणे आवश्यक असल्याचेही संस्थेने स्पष्ट केले. शासनाने याबाबत सकारात्मक निर्णय घेतल्यास आर्थिक संकटात सापडलेल्या कुटुंबांना मोठा आधार मिळू शकतो.