पंढरपूर – मागील चार वर्षामध्ये कारखान्याने एफ.आर.पी. पेक्षा जादा दर दिल्यामुळेही विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला तोटा सहन करावा लागला आहे. या बरोबरच १२५० टीसीडी क्षमता असणारा कारखाना येणाऱ्या हंगामात १२५०० टीसीडी क्षमतेने चालणार आहे. कारण मागील दोन वर्षात ८० कोटी रुपयेची गुंतवणूक करुन कारखान्यात आधुनिकीकरण दुरुस्तीकरण केलेले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात आपला कारखाना १२५०० मे.टन प्रतिदिन क्षमतेने चालणार आहे असल्याचे विठ्ठल कारखान्याचे चेअरमन तथा आमदार अभिजीत पाटील यांनी नमूद केले.
श्री विठ्ठल सह. साखर कारखान्याची अधिमंडळाची ५१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी (दि.२६) कारखाना कार्यस्थळावर कारखान्याचे चेअरमन, आमदार अभिजीत पाटील यांचे अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी मार्गदर्शन करताना श्री. पाटील बोलत होते. दरम्यान सभेच्या अगोदर सन २०२६-२७ गळीत हंगामाचा ४५ वा बॉयलर अग्नि प्रदिपन समारंभ देखील संपन्न झाला.
सभेच्या सुरुवातीस श्री विठ्ठलाच्या प्रतिमेचे पुजन, कारखान्याचे संस्थापक-चेअरमन कर्मवीर कै. औदुंबरआण्णा पाटील, संस्थापक व्हाईस चेअरमन यशवंतभाऊ पाटील, दिवंगत सर्व माजी चेअरमन यांच्या प्रतिमेचे पुजन उपस्थित जेष्ठ सभासदांचे हस्ते करण्यात आले. अधिमंडळाच्या ५१ वी वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये चेअरमन तथा आमदार अभिजीत (आबा) पाटील यांनी सन २०२५-२०२६ हंगामाचा अहवाल सादर केला,
यावेळी चेअरमन पाटील यांनी मागील हंगामाचा लेखाजोखा मांडत असताना सन २०२२ पासून कारखान्याची असलेली आर्थिक परिस्थिती व वाढलेली गाळप क्षमता, कारखान्याने दिलेला ऊसाचा दर, यंत्रसामुग्रीमध्ये केलेली आधुनिक सुधारणा, कारखान्याच्या शैक्षणिक संकुलामध्ये केलेल्या सुधारणा, वृक्ष लागवड तसेच परिसर विकास यासह दिर्घकालीन अडकुन राहिलेले कर्मचाऱ्यांचे पगार, हुद्दा व कायम वर्गवारीचे विषय अशा विस्तृत विषयांवर भाष्य केले.
मागील काही दिवसांपासून समाजमाध्यमांव्दारे आपला कारखाना व कारखान्याचे संचालक मंडळाची बदनामी करण्याचा प्रयत्न काही कारखाना विरोधी भूमीका असणाऱ्या लोकांकडून केला जात आहे. अशा प्रवृतीच्या लोकांना कारखाना सभासद त्यांची योग्य जागा दाखवतील याची मला खात्री असल्याचा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. दरम्यान कारखान्यावर असलेले कर्ज फेडणेसाठी उत्पन्न वाढविणे गरजेचे आहे. कारखान्याचे आर्थिक नियोजन व विकास यामध्ये कसलीही तडजोड केली जाणार नाही, असेही यावेळी त्यांनी सांगितले. यावेळी कारखान्याचे सभासद, उस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
———————-
ठळक मुद्दे : शासनाकडून इथेनॉल धोरण बंद केल्याने अडचण निर्माण झाली.साखरेचे किमान विक्री मुल्य (एम.एस.पी.) ४७०० ते ४८०० असणे गरजेचे. कारखाना कार्यस्थळावर बायोसीएनजी ३ टन प्रकल्पाची बांधा वापरा व हस्तातंर करा या तत्वावर उभारणी करुन प्रकल्प कार्यान्वीत. पुढील वर्षी कारखाना मालकीचा ४ टन क्षमतेचा प्रकल्प उभा करणेचा मानस. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून श्री विठ्ठल कृषी महाविद्यालय झाल्याची माहिती चेअरमन पाटील यांनी दिली.
Post Views: 17