पंढरपूर – भारताची दक्षिण काशी व महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले तिर्थक्षेत्र पंढरपूर हे श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान म्हणून प्रसिध्द आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात रविवारी (ता.८) रंगपंचमी मोठ्या उत्साहात व पारंपारिक पद्धतीने साजरी करण्यात आली. विठूरायावर केशर आणि गुलालाची उधळण केल्यावर ” अवघा रंग एक झाला , रंगी रंगला श्रीरंग ” या अभंगाची प्रचिती आली.
रंगपंचमी दिवशी दुपारी साडेचारच्या सुमारास श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची पाद्यपुजा विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे व्यवस्थापक संदेश भोसले यांचे हस्ते करण्यात आली. यावेळी मंदिर समितीचे सदस्य संभाजी शिंदे व लेखाधिकारी मुकेश अनेचा तसेच अनेक विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
या उत्सवाचे सर्व नियोजन मंदिर समितीच्या सर्व विभाग प्रमुखांनी तसेच नित्योपचार विभागातील विभाग प्रमुख आणि कर्मचाऱ्यांनी केले होते. यावेळी उत्साहात मंदीर समितीचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते.
————————
विठुरायाच्या मुर्तीवर केशरयुक्त रंग व गुलाल
रंगपंचमी निमित्त विठुरायास पांढऱ्या रंगाचा पोशाख परिधान करण्यात आलेला होता. देवाला सोन्याच्या मुकुटा ऐवजी पांढऱ्या रंगाचे पागोटे बांधण्यात आलेले होते. त्या नंतर देवाच्या अंगावर केशरयुक्त रंग व गुलाल टाकण्यात येऊन देवाची रंगपंचमी साजरी करण्यात आली. त्यामुळे रंगाची उधळण कऱण्यात आल्यावर मुळातच राजस सुकुमार मदनाचा पुतळा असे साक्षात संतमहात्म्यांनी वर्णिलेल्या विठुरायाचे रुप अधिकच लोभस दिसत होते.
———————–
पारंपारिक पध्दतीने ढफाची मिरवणूक
देवाच्या अंगावर केशरयुक्त रंग व गुलाल टाकण्यात आल्या नंतर डफाची पुजा करुन नामदेव पायरी- तुकाराम भवन – पश्चिम द्वार – चौफाळा – पश्चिम द्वार – व्हीआयपी गेट – नामदेव पायरी अशी मंदिर प्रदक्षिणा करून डफाची सवाद्य मिरवणुक काढण्यात आली. सदर मिरवणुकीमध्ये रंगाची उधळण करून व मानकऱ्यांना प्रसाद देवून वसंतोत्सवाची सांगता करण्यात आली. यावेळी उत्साहात मंदीर समितीचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते.
———————–
देवाच्या रंगोत्सवाची सांगता
वसंतोत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे रंगपंचमी. वसंतपंचमी पासून ते रंगपंचमी पर्यंत दररोज विठूरायाला पांढऱ्या पोशाखावर गुलाल टाकून पूजा केली जाते. सलग महिनाभर हा दिनक्रम सुरु असतो. या उत्सवाची रंगपंचमीला सांगता होते.
————————
फोटोओळी : पंढरपूर : येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने रंगपंचमी निमित्त पारंपारिक पध्दतीने देवाच्या ढफाची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली होती.

















