सांगोला -जागतिक महिला दिनानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या राज्य महिला आयोगाच्या वतीने शनिवार दि.७ मार्च रोजी मुंबई येथील रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी येथे आयोजित कार्यक्रमात ग्रामीण भागात महिलांच्या सक्षमीकरणासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्था व व्यक्तींचा सन्मान करण्यात आला.
यामध्ये भारतीय स्त्री शक्तीच्या सांगोला शाखेला उत्कृष्ट समाजकार्याबद्दल राज्यस्तरीय पुरस्कार महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. याप्रसंगी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, सचिव नंदिनी आवडे, आ.ऍड.मनीषा कायंदे, रवींद्र नाट्य मंदिरच्या संचालिका मृणाल जोगळेकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते. हा पुरस्कार सांगोला शाखेच्या अध्यक्षा ऍड.राजेश्वरी केदार, सचिवा वसुंधरा कुलकर्णी, सहसचिवा डॉ.चित्रा जांभळे यांनी स्वीकारला.
भारतीय स्त्री शक्ती, शाखा सांगोला ही १ जून २००४ पासून ग्रामीण व दुष्काळग्रस्त भागात महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी कार्यरत आहे. मैत्रीण कुटुंब सल्ला केंद्र, महिला आरोग्य जनजागृती अभियान, किशोर-किशोरी विकास कार्यक्रम, तेरे मेरे सपने विवाहपूर्व संवाद प्रकल्प, बालविवाह प्रतिबंध संस्थेच्या या सातत्यपूर्ण, पारदर्शक व परिणामकारक कार्याची दखल घेऊन सदर पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या सन्मानामुळे ग्रामीण महिला सक्षमीकरणाच्या कार्याला अधिक प्रेरणा मिळणार असल्याची भावना शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.


















