बार्शी – सध्या तिसऱ्या महायुध्दाच्या उंबरठ्यावर आपण उभे आहोत. संघर्ष आणि युद्ध होण्याचे मोठे कारण म्हणजे आपल्यातील संवेदनशीलता हरवत चालली आहे, असे प्रतिपादन संस्थेचे खजिनदार जयकुमार शितोळे यांनी केले.
येथील श्री शिवाजी महाविद्यालय, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने पीएम उषा योजनेअंतर्गत कपॅसिटी बिल्डिंग प्रोग्रामच्या समारोप समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अब्दुल शेख हे होते.
यावेळी सॉफ्टटेक सोल्यूशन कंपनीचे (पुणे) संचालक चेतन टाकसाळे, खेतान लाइब्रेरी कंपनी (मुंबई) सहयोगी संचालक डॉ. प्रल्हाद जाधव, डॉ. अनिल फाटक, डॉ. राहुल देशमुख, डॉ. वशिष्ठ गुरमे, ग्रंथपाल माधव टिपरसे आदी उपस्थित होते.
पुढे शितोळे म्हणाले की, भोवतालच्या अस्थिर सामाजिक वातावरणात टिकून राहण्यासाठी विद्यार्थ्यांनी उत्तम दर्जाची पुस्तके वाचावीत. तसेच विद्यार्थ्यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या पाहिजेत. सखोल अभ्यासच आपल्या प्रगतीची दिशा निश्चित करतो, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सोमनाथ यादव यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. किशोर गरड यांनी, तर आभार सहाय्यक ग्रंथपाल हणुमंत घावटे यांनी मानले.
























