लोहा : राज्यातील शेतकरी आत्महत्यामुक्त करु, शेतकऱ्यांना जोडधंदा उपलब्ध करून देवू, असे प्रतिपादन शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. लोहा येथे रविवारी आयोजित राज्यस्तरीय शेतकरी अधिवेशन व पक्षप्रवेश सोहळ्यात ते बोलतहोते.
पुढे बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, गेल्या चाळीस वर्षांपासून शेतकऱ्याचे हित जपण्यासाठी शेती मालाला योग्य भाव मिळावा म्हणून शेतकरी नेते शंकरअण्णा धोंडगे यांनी राज्यात लढा उभारला. आज त्यांनी शेतकऱ्याच्या हिताचे निर्णय घेणाऱ्या शिवसेना पक्षात प्रवेश केला. त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला, हे माझे भाग्य समजतो.
राज्यातील शेतकरी जगला पाहिजे, त्यांना न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका माझी पण आहे. मी सुध्दा शेतकरी कुटुंबातील आहे. त्यामुळे मुख्यमंत्री होताच शेतकऱ्याच्या हिताचे निर्णय घेतले. राज्यातील तिजोरीवर बळीराजाचा अधिकार आहे, त्यांच्या हितासाठी नियम बाजूला ठेऊन निर्णय घेण्याचे काम केले. यापुढेही शेतकऱ्याच्या हिताचे निर्णय घेतले जातील. शेतकऱ्यांना जोडधंदा निर्माण करून दिला जाईल, सिंचनाचा प्रश्न मार्गी लाऊन शेतकरी सुखी कसा होईल, या दृष्टीने उपाययोजना आखल्या जातील. शेतकरी आत्महत्यामुक्त
राज्य निर्माण करू, मराठवाड्यातील सिंचनाचा प्रश्न सोडवून मराठवाडा दुष्काळमुक्त करण्याची भूमिका आहे.
शेतकऱ्याच्या शेतीला योग्य भाव
देण्याचा प्रयत्न असणार आहे, कर्जमाफी जाहीर केली ती पूर्ण करण्यात येईल, अतिवृष्टी असोकी गारपीट असो शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे काम राज्यातील शिवसेना सरकारने केले आहे, लाडकी बहीण योजना सुरूकेलीती कधी ही बंद होणार नाही. येणाऱ्या काळात २१०० रुपये लाडक्या बहीण यांना देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी काळजी करण्याची गरज नाही. शेतकरी नेते शंकरअण्णा धोंडगे हे शिवसेनेत आले आहेत. आता शेतकऱ्याचे प्रश्न नक्की सुटतील. शंकरअण्णा धोंडगे आता तुम्ही तालुक्याचे नेतृत्व करू नका तर किसान सेनेच्या माध्यमातून राज्यात शेतकऱ्याची चळवळ शिवसेनेच्या पाठीशी उभी करा. शेतकऱ्याच्या हितासाठी
सिंचन प्रश्न, विकास कामे पूर्ण करण्यासाठी शिवसेना तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार आहे, असे म्हणूनत्यांनी जय जवान जय किसान असा नारा दिला.यावेळी शंकरअण्णा धोंडगे व त्यांच्या समर्थकांनी लाकडी नागर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेट दिला. यावेळी माजी गृहमंत्री सीताराम म्हेत्रे, खा. ज्योतीताई वाघमारे, आ. हेमंत पाटील, आ. बालाजी कल्याणकर, आ. बाबुराव कदम, आ. आनंदराव बोंढारकर, माजी आ. सुधाकर भालेराव, माजी आ. मनोहर पटवाणी, माजी आ. शंकरअण्णा धोंडगे, शिवराजदादा धोंडगे, दिलीपदादा धोंडगे, दत्ता पवार यांच्यासह राज्यभरातील पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

















