अकलूज – जागतिक आरोग्य दिन व माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित अकलूज ते अकलूज या सुमारे ७५ किलोमीटर माळशिरस तालुका सायकल राईड मध्ये राज्यातील १२५ सायकल रायडर्सनी भाग घेतला असून रविवार दि ५ एप्रिल रोजी सकाळी ६ वाजता या राईडचा शुभारंभ होणार असल्याची माहिती सायकल रायडर्स असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष सूर्यकांत भिसे यांनी दिली.
अकलूज येथील विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुल येथून सकाळी ६ वाजता अकलूज नगर परिषदेचे नगरसेवक सयाजीराजे मोहिते पाटील यांच्या हस्ते तर अकलूज पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नीरज उबाळे यांच्या अध्यक्षतेखाली या सायकल राईडचा शुभारंभ होणार आहे. अकलूज – माळीनगर -२५/४ – महाळुंग – श्रीपूर – बोरगाव – माळखांबी – बोंडले – वेळापूर – खुडूस – माळशिरस – संग्रामनगर – अकलूज असा या सायकल राईडचा मार्ग असणार आहे.
माळशिरस येथे सकाळी ११ वाजता पंचायत समितीच्या वतीने जिल्हा परिषद सदस्य अर्जुनसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते व सभापती दत्ताभैय्या मगर यांच्या अध्यक्षतेखाली सायकल राईडचे स्वागत करण्यात येणार आहे. येथील पंचायत समिती सभागृहात सायकलिंग काळाची गरज या विषयावर आंतरराष्ट्रीय सायकल रायडर्स सतीश जाधव (मुंबई) यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
अकलूज येथील विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुल येथे सायंकाळी ४ वाजता शिवरत्न शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा शीतलदेवी मोहिते पाटील यांच्या हस्ते व अकलूजचे उपनगराध्यक्ष शिवतेजसिंह मोहिते पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व नगराध्यक्षा रेश्मा अडगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत सहभागी सायकल रायडर्सना मेडल व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे असे भिसे म्हणाले.


















