वेळापूर – माळशिरस तालुक्यातील मळोली गावातील विनायक अण्णा डीपीचा ट्रान्सफॉर्मर अवघ्या एका दिवसात बसवण्यात आल्याने ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे.
वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे ग्रामस्थांना विविध अडचणींचा सामना करावा लागत होता. शेतीकामे, घरगुती कामकाज, व्यावसायिक व्यवहार तसेच विद्यार्थ्यांच्या अभ्यासावरही त्याचा परिणाम होत होता. अशा परिस्थितीत हा ट्रान्सफॉर्मर तातडीने बसवण्यात आल्याने गावातील वीजप्रश्न मार्गी लागला आहे.
या कामासाठी आमदार उत्तमराव जानकर व रणजीतसिंह जाधव यांनी संबंधित विभागाकडे पाठपुरावा करून प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले. गावातील अडचण लक्षात घेऊन त्यांनी महावितरण विभागाशी संपर्क साधत ट्रान्सफॉर्मर तातडीने बसवण्याची मागणी केली होती. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळत अवघ्या एका दिवसात ट्रान्सफॉर्मर बसवण्यात आला.
आजच्या काळात अनेक कामे पाठपुराव्याअभावी रखडत असल्याचे चित्र दिसून येते. मात्र लोकप्रतिनिधींनी गावातील समस्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन प्रशासनाशी समन्वय साधल्यास कामे जलद गतीने पूर्ण होऊ शकतात, याचे उदाहरण मळोली येथील या घटनेतून दिसून आले.
ट्रान्सफॉर्मर बसवण्यात आल्याने गावातील वीजपुरवठा सुरळीत झाला असून ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. याबद्दल मळोलीकरांच्या वतीने आमदार उत्तमराव जानकर व रणजीतसिंह जाधव यांचे आभार व्यक्त करण्यात आले.



















